विकसित भारताचा संकल्प घेऊन साताऱ्यात ‘सेवा ज्योती यात्रा
शिवेंद्रसिंहराजे–उदयनराजेंच्या उपस्थितीत ‘विकसित भारत संकल्प सभा’
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या सेवापर्वाचा गौरव
सातारा : प्रतिनिधी
‘२५ वर्ष जनसेवेतून राष्ट्रसेवा’ आणि ‘विकसित भारत’चा संकल्प घेऊन साताऱ्यात ‘विकसित भारत संकल्प सभा’ व ‘सेवा ज्योती यात्रा’चा शुभारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शाहू कला मंदिर येथे करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाजप पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला राजकीय रंगत आली.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे प्रसारण करण्यात आले. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी प्रतिज्ञा घेऊन विकसित भारत संकल्प सोडण्यात आला. सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी उदयनराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’चा मंत्र : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा मोदींचा २५ वर्षांचा सेवाप्रवास असून, या काळात विकासाचा संकल्प, राष्ट्रहिताची बांधिलकी आणि जनसेवेची भावना केंद्रस्थानी राहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला आणि पायाभूत सुविधांना गती मिळाली आहे. रस्ते, पूल, बंदरे, विमानतळ यांसह विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. भारताची जागतिक पातळीवरील प्रतिमा बदलत असून, देशाला जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये नेण्याचे उद्दिष्ट आहे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
देशाच्या सुरक्षेबाबतही केंद्र सरकारने कणखर भूमिका घेतली असून, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. ‘हा नवा भारत आहे’, असा संदेश जगाला देण्याचे काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या विकासाची ही प्रक्रिया अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान देण्याची गरज आहे. ‘विकसित भारतचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा ज्योती यात्रा’ महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही संघटना आणि राजकीय पक्षांकडून होत असल्याचा आरोपही शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. देशाच्या विकासासाठी आणि स्थैर्यासाठी समाजाने एकत्रितपणे योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी मोदींच्या विकासदृष्टीची सांगड : खासदार उदयनराजे
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या प्रगतीचा आणि उत्कर्षाचा विचार केला. जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्याच विचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटींचा संदर्भ देताना उदयनराजे म्हणाले की, दिल्लीतील भेटींमध्ये मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा आवर्जून उल्लेख केला जातो. महाराजांचे कुशल नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनकल्याणाचा दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून आजच्या पिढीने आणि समाजातील प्रत्येक घटकाने प्रेरणा घेऊन त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.
‘२५ वर्षांचे सेवापर्व’ ठरले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सार्वजनिक जीवनात सुरू केलेल्या प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘२५ वर्षांच्या सेवापर्वा’चा कार्यक्रमात गौरव करण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा हा प्रदीर्घ प्रवास राष्ट्रसेवेच्या संकल्पाला समर्पित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ‘स्वप्ने मोठी असली पाहिजेत आणि कर्माला आपले कर्तव्य मानले पाहिजे,’ या विचारातून देशाच्या विकासासाठी काम करण्याचा संदेशही कार्यक्रमातून देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभय्या भोसले, विकास भोसले, आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!