पुणे विभाग शिक्षक
मतदारसंघावरून
महायुतीमधील
अंतर्गत मतभेद उघड
रामराजेंची शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना फलटणमध्ये उघड साथ
महायुतीत नवा ट्विस्ट; उमेदवारीचा तिढा नव्या राजकीय वळणावर
संतोष शिराळे : सातारा प्रतिनिधी
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आता फलटणच्या राजकारणातून उघड झाले आहेत. भाजपकडून कौस्तुभ गावडे, तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे रिंगणात असल्याने महायुतीतील घटक पक्षच आमनेसामने आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचारासाठी आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ चिवटे यांच्या उमेदवारीला स्पष्ट पाठिंबा दिला. “राज्यपातळीवर आपले ऐकले गेले नाही, दिलेला शब्द पाळला नाही, तर अपक्ष लढा. फलटणचा डीएनएमध्येच अपक्ष आहे. तुम्ही काळजी करू नका,” असा थेट सल्ला त्यांनी चिवटे यांना दिला.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या वक्तव्याने महायुतीतील पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा नव्या राजकीय वळणावर पोहोचला आहे. महायुतीतील जागावाटपाचा निर्णय अद्याप पूर्णपणे स्पष्ट नसतानाच भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेने मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवार घोषित करून एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे एकाच आघाडीतील दोन घटक पक्षांचे उमेदवार शिक्षक मतदारसंघाच्या रिंगणात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रामराजेंच्या वक्तव्याने राजकीय संदेश
फलटणच्या सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी चिवटे यांना दिलेला सल्ला हा केवळ प्रचारसभेतील वक्तव्य न राहता महायुतीतील जागावाटपाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे. “मी १९९६ साली आलो तेव्हाही असंच सर्वांनी मला पाठवलं होतं,” असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर फलटणमधील संजीवराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाशी संबंधित आहेत. त्यामुळे एकाच राजकीय कुटुंबातील दोन प्रमुख नेत्यांची भूमिका महायुतीतील वेगवेगळ्या घटकांच्या राजकीय समीकरणांशी जोडली जात आहे.
संजीवराजेंचा ‘माघार नाही’चा निर्धार
सभेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला ठाम पाठिंबा दर्शविला. “एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, तर निवडूनच यायचे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. मंगेश चिवटे यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील कामाचा संदर्भ देत त्यांनी चिवटे यांच्या जनसेवेचा मुद्दाही अधोरेखित केला. त्यामुळे फलटणच्या सभेतून चिवटे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरील राजकीय पाठबळ दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र दिसून आले.
भाजप–शिवसेना आमनेसामने
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेकडून मंगेश चिवटे अशी महायुतीतीलच दोन नावे पुढे आली आहेत. शिवसेनेने चिवटे यांना एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी स्पष्ट झाली आहे. चिवटे यांनीही उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना, “मी लढणार आणि जिंकणारच; कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे माघारीपूर्वी महायुतीतील घटक पक्षांमध्ये तोडगा निघतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माघारीनंतरच अंतिम चित्र
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता छाननी आणि माघारीच्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. दि. ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर महायुतीतील प्रत्यक्ष लढतीचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे भाजप–शिवसेना उमेदवारीच्या तिढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक राजकारणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता केवळ उमेदवारांमधील लढत न राहता महायुतीतील समन्वय, घटक पक्षांचे स्थानिक राजकीय हितसंबंध आणि वरिष्ठ पातळीवरील जागावाटप यांचीही परीक्षा ठरणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद आता फलटणच्या राजकारणातून उघड झाले आहेत. भाजपकडून कौस्तुभ गावडे, तर शिवसेनेकडून मंगेश चिवटे रिंगणात असल्याने महायुतीतील घटक पक्षच आमनेसामने आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांना जाहीरपणे पाठिंबा देत ‘गरज पडली तर अपक्ष लढा’ असा दिलेला सल्ला हा या निवडणुकीतील महत्त्वाचा राजकीय संदेश ठरला आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ‘माघार नाही, निवडूनच यायचे’ अशी भूमिका घेत चिवटेंच्या उमेदवारीला स्थानिक पाठबळ दिले आहे. त्यामुळे फलटणमध्ये रामराजे–संजीवराजे या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेतून चिवटेंना समर्थन मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता खरी उत्सुकता ९ ऑक्टोबरच्या माघारीपूर्वी भाजप–शिवसेनेत समन्वय होतो का, की महायुतीतील दोन्ही उमेदवार प्रत्यक्ष मैदानात राहतात, याची आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!