नेवेकरवाडीत दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ हैराण; दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; प्रतापगड कारखान्याच्या पाण्यामुळे विहीर दूषित; ग्रामस्थांचा आरोप, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप

नेवेकरवाडीत दूषित

पाण्यामुळे ग्रामस्थ हैराण

दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

प्रतापगड कारखान्याच्या पाण्यामुळे विहीर दूषित

प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा संताप

कुडाळ | प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील नेवेकरवाडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील विहिरीचे पाणी हिरवट व दूषित झाल्याने ते पिण्यासाठी वापरणे धोकादायक ठरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना इतरांच्या विहिरींवर अवलंबून राहावे लागत असून, महिलांसह नागरिकांना दररोज पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या प्रश्नाकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी नेवेकरवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि दूषित झालेल्या विहिरीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याच्या समस्येबाबत आपली व्यथा मांडत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी सांगितले की, नेवेकरवाडीच्या परिसरात असलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे गावातील विहिरीचे पाणी दूषित होत असल्याचा संशय आहे. विहिरीतील पाण्याचा रंग हिरवट झाला असून पाण्यातील गुणवत्ता खालावली आहे. दूषित पाणी पिण्यासाठी तर सोडाच; जनावरेही हे पाणी पिण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याबाबतही चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून विहिरीचे पाणी वापरण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना आसपासच्या इतर विहिरींमधून पाणी आणावे लागत आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रोजगार, शेती, व्यवसाय आणि इतर कामे सोडून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेळ खर्च होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.

दरम्यान, विहिरीवरील वीज कनेक्शन गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने पाणी उपसण्याची व्यवस्थाही ठप्प झाली आहे. त्यामुळे आधीच गंभीर असलेला पाण्याचा प्रश्न आणखी बिकट झाला आहे. संबंधित यंत्रणांनी वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.

दूषित पाणी दीर्घकाळ वापरल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने तातडीने गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी आणि अहवाल ग्रामस्थांसमोर जाहीर करावा, अशीही मागणी पुढे आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित परिसराची पाहणी करून कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गटविकास अधिकारी, ग्रामविकास विभाग तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नेवेकरवाडीला पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. विहिरीची स्वच्छता करून ती पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी संदीप पवार यांनी ग्रामस्थांची समस्या जाणून घेत प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर नागरिकांना दोन-दोन महिने संघर्ष करावा लागत असेल, तर संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“ग्रामस्थांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. दूषित पाण्याच्या तक्रारीची तातडीने शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून दोषी कारण स्पष्ट करावे आणि नागरिकांना त्वरित पर्यायी पाणी उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



Post a Comment

0 Comments