मेटगुताड येथे अपघातातील जखमी गाय वाचवण्यासाठी धावली माणुसकी...! जनावराला मोकाट सोडणाऱ्या मालकांविरोधात नागरिकांचा संताप

मेटगुताड येथे अपघातातील

जखमी गाय वाचवण्यासाठी

धावली माणुसकी..!

जनावराला मोकाट सोडणाऱ्या मालकांविरोधात नागरिकांचा संताप

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर–पाचगणी मार्गावरील मेटगुताड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेली गाय रस्त्यावर वेदनेने तडफडत असताना, तिच्या मदतीसाठी अनेक अनोळखी हात पुढे सरसावल्याचे हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. मात्र, दुसरीकडे जनावराला मोकाट सोडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप होत असल्याने संबंधित मालकांविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

मुसळधार पावसात जखमी अवस्थेत पडलेल्या गाईच्या वेदना पाहून तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न सुरू केला. जवळपास एक तास प्रयत्न करूनही अधिकृत मदत पोहोचत नसल्याने उपस्थितांनी स्वतःच रेस्क्यूची जबाबदारी उचलली. त्यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

गाईला पुढील उपचारासाठी वाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलविण्याची तयारी सुरू असतानाच संबंधित गाय मालकीचे असल्याचे सांगणारे आखाडे दाम्पत्य घटनास्थळी आले. उपस्थितांनी गाय मोकाट का सोडली, असा जाब विचारल्यानंतर वाद निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर जनावराला बेवारसपणे मोकाट सोडून त्याच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ही घटना केवळ एका जखमी गाईची नाही, तर समाजापुढील मोठा प्रश्न अधोरेखित करणारी आहे. जनावरे मोकाट सोडण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून त्यात निष्पाप प्राणी आणि नागरिक दोघांच्याही जीविताला धोका निर्माण होत आहे. प्राण्यांवर प्रेम व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

"माणुसकीने आपले कर्तव्य निभावले; आता कायद्यानेही आपली जबाबदारी पार पाडावी," अशी मागणी स्थानिक नागरिक आणि उपस्थित प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments