जावळी तालुक्यातील कावडी गावातील विविध विकासकामांमुळे खुललेले निसर्गरम्य आणि आदर्श ग्रामविकासाचे चित्र. (छाया : अजित जगताप, पाचगणी)
जावळीतील कावडी गाव ठरतेय
आदर्श विकासाचे प्रेरणास्थान
श्रमदान, लोकसहभाग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पर्यटकांचे आकर्षण
संतोष शिराळे, सातारा |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील कावडी गावाने लोकसहभाग, श्रमदान आणि नियोजनबद्ध विकासाच्या बळावर आदर्श ग्रामविकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. एकेकाळी दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना मोफत पिठाची गिरणी, स्वच्छ पाणी, सौरऊर्जा, आधुनिक सुविधा आणि विविध लोककल्याणकारी उपक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कुडाळ–पाचगणी मार्गावरील हातगेघर धरण परिसरातील हे गाव विस्थापनाच्या वेदना सोसूनही नव्या उमेदीने उभे राहिले आहे. कोयना, कण्हेर आणि हातगेघर धरण प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागले; मात्र कावडी ग्रामस्थांनी संकटावर मात करत विकासाचा नवा मार्ग स्वीकारला.
भाजप नेते व जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी श्रमदानातून गावाचा कायापालट घडवून आणला. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजूभैया भोसले, उद्योजक मोहन मानकुमरे, ॲड. बापूसाहेब मानकुमरे तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य या विकासकामांना लाभले.
सुमारे ४०० लोकवस्ती असलेल्या कावडी गावात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. नाना-नानी पार्क, व्यायामशाळा, वृक्षलागवड, ठिबक सिंचन, प्लास्टिकमुक्त गाव, सुसज्ज गटार व्यवस्था, ज्ञानवर्धिनी केंद्र, ई-कार्यालय प्रणाली, सामाजिक सभामंडप, कला दालन, सौरऊर्जा प्रकल्प, सीसीटीव्ही व्यवस्था, यशोगाथा वाचनालय, महिला बचत गटासाठी स्वतंत्र कार्यालय, वसंत सागर कृषी पर्यटन, शिवेंद्रसिंहराजे भोसले क्रीडा संकुल, सुसज्ज स्मशानभूमी, भैरवनाथ मंदिर, बुद्ध विहार, अंतर्गत काँक्रीट रस्ते, पारसबाग, गटशेती, दगडी बंधारे आणि बोट क्लब यांसारख्या सुविधा गावात उभारण्यात आल्या आहेत.
महिलांच्या आरोग्यासाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण, स्वच्छ पिण्याचे पाणी अवघ्या एका रुपयात प्रतिलिटर उपलब्ध करून देण्याची योजना तसेच कापडी पिशव्यांचे वाटप यांसारखे उपक्रमही ग्रामपंचायतीने राबविले आहेत.
कावडी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या उपाहारगृहातील गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पर्यटक गावातील विकासकामांची पाहणी करत आहेत. त्यामुळे पाचगणी–महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी कावडी हे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
कावडीच्या विकासासाठी झटणारी टीम
ग्रामसेवक मंगेश शिंदे, सरपंच यशवंत मानकुमरे, उपसरपंच शशिकांत मानकुमरे, प्रफुल्ल सपकाळ, महेश मानकुमरे, वैभव मानकुमरे, शंकर रामू मानकुमरे, जगन्नाथ शिराळे, भीमराव मानकुमरे, लक्ष्मण धनावडे, शालेय शिक्षक-शिक्षिका, आशा व अंगणवाडी सेविका विमल गोळे तसेच मुंबईस्थित कावडी ग्रामस्थ यांच्या श्रमदान आणि योगदानामुळे गावाचा विकास शक्य झाला आहे. अनेक मान्यवरांनी गावाला भेट दिल्यानंतर कावडीला भविष्यात विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!