हातगेघर उपसा सिंचन
योजनेला तत्त्वतः मान्यता
२२७ हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्राला पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा
शिवेंद्रसिंहराजे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
संतोष शिराळे, सातारा |
जावली तालुक्यातील हातगेघर येथील शेतजमिनींसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे हातगेघर परिसरातील सुमारे २२७ हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्राला पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीत कुडाळी प्रकल्पातील बंदिस्त नलिका प्रणालीमुळे होणाऱ्या पाण्याच्या बचतीचा वापर करून हातगेघर परिसरातील अतिरिक्त क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचा प्रस्ताव तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार योजनेला तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून आता सर्वेक्षण, संकल्पना आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया गतीने राबविण्यात येणार आहे.
याच बैठकीत सातारा तालुक्यातील लिंब येथील कातकरी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी धोम उजव्या कालव्यालगत आवश्यक परवानगी देण्यासही मान्यता देण्यात आली. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) योजनेअंतर्गत पद्मावती मंदिर ते कातकरी वस्ती हा रस्ता प्रस्तावित असून, त्यामुळे आदिवासी बांधवांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी दळणवळणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. बैठकीदरम्यान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, आदिवासी वस्तींसाठी मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांना प्राधान्य देत संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
हातगेघर उपसा सिंचन योजनेला मिळालेली तत्त्वतः मान्यता ही जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, भविष्यात या परिसरातील शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"हातगेघर उपसा सिंचन योजनेला तत्त्वतः मान्यता मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे (बाबाराजे) भोसले यांनी दिलेला शब्द पाळला. या निर्णयामुळे २२७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच योजनेच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व संबंधित अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार."
श्रीहरी गोळे, माजी मंडलाध्यक्ष भाजप जावळी तालुका




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!