शासकीय इतमामात जवान तुषार भिलारे यांना अखेरचा निरोप; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार


जवान तुषार भिलारे यांच्यावर

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संतोष शिराळे, सातारा |

पवारवाडी (ता. जावली) येथील भारतीय सैन्यातील जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय 34) यांच्यावर बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्याच्या शोकमय सलामीसह आणि राष्ट्रध्वजात लपेटलेल्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

तुषार भिलारे हे भारतीय सैन्यात लान्स नायक पदावर कार्यरत होते. ते मध्यप्रदेशातील महू येथे एमसीटीई (MCTE), कॉर्प्स ऑफ सिग्नल्स या युनिटमध्ये सेवा बजावत होते. दीड महिन्यांपूर्वी सुट्टीवर गावी आले असताना झाडावरून पडल्याने त्यांचा गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी (दि. 30 जून) त्यांची प्राणज्योत मालवली.

सन 2010 मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेल्या तुषार भिलारे यांचा सेवाकाळ अत्यंत उल्लेखनीय राहिला. फेब्रुवारी 2027 मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या अपघातामुळे त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

अंत्यसंस्कारावेळी सैन्य दलाच्या जवानांनी शोक सलामी दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "भारत माता की जय" आणि "तुषार भिलारे अमर रहे" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.

तुषार भिलारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पवारवाडीसह संपूर्ण जावळी तालुक्यावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी एका कर्तव्यदक्ष आणि देशसेवेला वाहिलेल्या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments