वाई एमआयडीसीतील फाउंड्रीत कामगाराची धक्कादायक आत्महत्या; धगधगत्या मेटल भट्टीत उडी; झारखंडच्या ४२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू, नैराश्याचा संशय

वाई एमआयडीसीतील

फाउंड्रीत कामगाराची

धक्कादायक आत्महत्या

धगधगत्या मेटल भट्टीत उडी; नैराश्याचा संशय

झारखंडच्या ४२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू

सातारा | प्रतिनिधी

वाई एमआयडीसी परिसरातील एका नामांकित फाउंड्री कंपनीत शनिवारी (दि. १८) पहाटे अत्यंत धक्कादायक घटना घडली. कंपनीत काम करणाऱ्या झारखंडमधील ४२ वर्षीय कामगाराने चालू असलेल्या धगधगत्या मेटल भट्टीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृताचे नाव दुर्गा रोहिता प्रधान (वय ४२) असे असून ते मूळचे राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम (झारखंड) येथील रहिवासी होते. सध्या ते वाई एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते.

प्रधान हे काही दिवसांपासून मानसिक नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फाउंड्रीमध्ये काम सुरू असताना त्यांनी अचानक धगधगत्या मेटल भट्टीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भट्टीतील प्रचंड उष्णतेमुळे त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून त्यांच्या नातेवाईकांना झारखंड येथे घटनेची माहिती देण्यात आली आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे व नमुने संकलित केले.

दुर्गा प्रधान यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा शोध पोलीस घेत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments