कराड गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार; फरार झालेल्या दोघांना अहिल्यानगरमधून अटक

कराड गोळीबार प्रकरणातील

दोन्ही आरोपी 24 तासांत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार

फरार झालेल्या दोघांना अहिल्यानगरमधून अटक

कराड | प्रतिनिधी

कराड तालुक्यातील पेरले गावाजवळ इंदोली पुलानजीक पिस्तुलातून गोळीबार करून तरुणाला गंभीर जखमी केल्यानंतर फरार झालेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सातारा आणि उंब्रज पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत अहिल्यानगर येथून अटक केली.

17 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी संतोष शंकर घोलप (वय 37, व्यवसाय – इम्पर वाहतूक सप्लायर, मूळ रा. कालगाव, ता. कराड) यांना पैशाचा व्यवहार मिटविण्याच्या बहाण्याने आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड) याने बोलावून घेतले. त्यावेळी त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) याने फिर्यादीस शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने फॉर्च्युनर कारमधून पिस्तूल काढून दोन राऊंड गोळीबार केला. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 297/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 49, 351(3), 352, 3(5), शस्त्र अधिनियम कलम 3(1), 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान आरोपी अहिल्यानगर येथे लपल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक चौकशीच्या आधारे कायनेटीक चौक परिसरातील साई सूर्या हॉटेलवर छापा टाकला. तेथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments