वारीच्या बंदोबस्ताचा गैरफायदा घेणाऱ्या तोतया पोलिसांचा पर्दाफाश; पुसेगाव पोलिसांची धाडसी कारवाई; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त असतानाच वाहनचालकांना अडवून खंडणीचा प्रयत्न; सात जण अटकेत, तीन महिलांचा समावेश; २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

वारीच्या बंदोबस्ताचा

गैरफायदा घेणाऱ्या

तोतया पोलिसांचा पर्दाफाश

पुसेगाव पोलिसांची धाडसी कारवाई

पालखी सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा व्यस्त असतानाच वाहनचालकांना अडवून खंडणीचा प्रयत्न

सात जण अटकेत, तीन महिलांचा समावेश

एकूण २१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

संतोष शिराळे | सातारा

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी वारीच्या बंदोबस्तासाठी अहोरात्र कार्यरत असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पोलीस असल्याची बतावणी करत वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल आणि रोख रक्कम असा २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सातही आरोपींना अटक करण्यात असून सर्व आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पाच दिवस मुक्कामी असणार असल्याने जिल्हा पोलीस दलाचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. यासाठी इतर जिल्ह्यांमधूनही अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. लाखो वारकऱ्यांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल दिवसरात्र कार्यरत आहे, असे पिंगळे यांनी सांगितले.

निखिल पिंगळे यांनी सांगितले, की १३ जुलै रोजी मध्यरात्री वर्धनगड (ता. खटाव) येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही जणांनी खाकी वेश परिधान करून लोखंडी बॅरिकेडिंग लावले आणि रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवून स्वतःला पोलीस असल्याचे सांगत कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना मिळताच त्यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे वाहन दिसताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चार पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. या कारवाईत विकास दत्तात्रय शिंदे (रा. वाळवा, सांगली), वैभव पांडुरंग पवार (रा. मिरज, सांगली), राहुल सुनील पाटील (रा. मिरज, सांगली), केतन बाबासाहेब महाजन (रा. मिरज, सांगली), प्रियांका रणदीप नाईक (रा. शिरोळ, कोल्हापूर), प्रियांका संजय भोरे (रा. मिरज, सांगली), अरुणा दयानंद आवळे (रा. मिरज, सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन दुचाकीस्वारांना आरोपींनी "आम्ही पोलीस आहोत" अशी बतावणी करून कारवाई टाळायची असेल तर ५०० रुपये द्या, अशी धमकी देत पैसे उकळल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर आरोपींनीही चौकशीदरम्यान पोलीस असल्याची खोटी बतावणी करून वाहनचालकांकडून खंडणी उकळल्याची कबुली दिल्याची माहिती त्यांनी दिली.

कारवाईदरम्यान आरोपींकडून टाटा सफारी स्टॉर्म (MH-12 MF-3832), मारुती स्विफ्ट डिझायर (MH-10 CA-4937), ८ अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार योगेश बागल, रेश्मा भोसले, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, उमेश देशमुख, दयाबा नरळे आणि चालक तुषार बाबर यांनी केली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे, की संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळे पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त वारीच्या मार्गावर तैनात असल्याने, ग्राम सुरक्षा यंत्रणा, ग्राम सुरक्षा दल, गावोगावचे तरुण तसेच नागरिकांनी आपल्या गावात आणि परिसरात अधिक सतर्क राहावे. वारीच्या काळात गावातील संशयास्पद हालचाली, अपरिचित व्यक्ती किंवा पोलीस असल्याचे भासवून कोणी तपासणी किंवा पैशांची मागणी करत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. वारीच्या पवित्र वातावरणात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, त्याचबरोबर नागरिकांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments