महू व हातगेघर धरणांच्या सांडव्यावरून पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

महू : मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यातील महू धरणाच्या सांडव्यावरून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग.

महू व हातगेघर धरणांच्या 

सांडव्यावरून धो धो पाणी

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संतोष शिराळे | सातारा

जावळी तालुक्यासह महाबळेश्वरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महू आणि हातगेघर धरणे भरू लागली असून दोन्ही धरणांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कुडाळी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्याचबरोबर हातगेघर धरणाच्या सांडव्यावरूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रातील प्रवाह वेगवान झाला आहे.

प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी जनावरे, शेतीसाहित्य आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

महू, टोपेवाडी, पिंपळी, खर्शी बारामुरे, करहर, वालुथ, हुमगाव, आखाडे, बामनोली, सांगवी, कुडाळ, सर्जापूर, कळंबे, उडतारे तसेच महू व हातगेघर धरणाखालील सर्व नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जावळी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments