सातारा घाटमाथ्यासाठी
रेड अलर्ट उद्यापर्यंत कायम
जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, संपर्क तुटला
धरणे भरली, पूल वाहून गेले, अपघातांची मालिका
संतोष शिराळे, सातारा |
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणे व तलाव तुडुंब भरले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती, रस्ते बंद, दरडी, अपघात आणि संपर्क तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी उद्यापर्यंत रेड अलर्ट कायम ठेवला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी उद्यापर्यंत (६ जुलै) रेड अलर्ट कायम ठेवला आहे. अतिमुसळधार ते अति तीव्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, घाटमाथ्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महाबळेश्वर, कास, तापोळा, कोयना, बामणोली, नवजा तसेच पश्चिमेकडील डोंगराळ भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरडी कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, घाटमार्गात वाहतूक विस्कळीत होणे आणि नद्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ७ जुलैपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज असून, पुढील दोन दिवस बहुतांश भागात ग्रीन अलर्ट राहणार आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घाटमाथ्याकडे प्रवास टाळावा, पर्यटनस्थळी जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणे भरली, पूल वाहून गेले, संपर्क तुटला, अपघातांची मालिका
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.
महिंद लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाई तालुक्यातील जोर खोऱ्यातील धनगरवस्तीचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुसळधार पावसामुळे वस्तीकडे जाणारे दोन्ही ओढे दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांची ये-जा बंद झाली असून अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे.
वाई शहरातील महात्मा फुले नगर–रविवार पेठ मार्गावरील किंवरा ओढ्यावरील तात्पुरता पूल रविवारी झालेल्या मुसळधार पावसात वाहून गेला. त्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेण्णा लेक पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून प्रशासनाने पर्यटकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
साताऱ्याचा प्रमुख जलस्रोत असलेल्या कास तलावातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून तलाव शंभर टक्के क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र तलाव परिसरात धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणाऱ्या पर्यटकांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात दगड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरडप्रवण भागात पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्याने पुन्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे 'वंडरमिस्ट' हॉटेलची २५ फुटांहून अधिक उंच संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. शेकडो टन दगड व मलबा रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने जीवितहानी टळली.
कराड–पाटण महामार्गावर मोप्रे गावाजवळ रंगाचे डबे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाला. अपघातात वाहन व साहित्याचे मोठे नुकसान झाले. अग्निशामक दल आणि क्रेनच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
वाई तालुक्यातील जांभळी लघुपाटबंधारे तलाव शंभर टक्के क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून ५०२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जांभळी ल.पा. तलावातील पाणी थेट धोम धरणात जमा होत असल्याने सध्या किंवा पुढेही कोणत्याही गावाला पूराचा धोका निर्माण होणार नाही, अशी माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली आहे.









0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!