जावळी तालुक्यातील सायघरमध्ये दरडीच्या धोक्याची घंटा..! पहाटे राहत्या घरावर दरड कोसळली; ११ कुटुंबांतील ४५ नागरिकांचे स्थलांतर

जावळी तालुक्यातील 

सायघरमध्ये दरडीच्या 

धोक्याची घंटा!

पहाटे राहत्या घरावर दरड कोसळली

११ कुटुंबांतील ४५ नागरिकांचे स्थलांतर

संतोष शिराळे | सातारा

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता डोंगराळ भागाला बसू लागला आहे. जावळी तालुक्यातील सायघर येथे आज पहाटे एका राहत्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, उपविभागीय अधिकारी श्री. आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगुल, गटविकास अधिकारी निलेश पाटील, पोलीस अधिकारी तसेच महसूल व ग्रामविकास विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

दरडीचा धोका कायम असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील ११ कुटुंबांतील ४५ नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. यापैकी एका कुटुंबाची शाळेत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली, तर उर्वरित दहा कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुरक्षित हलविण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

डोंगर उतार, दरडीचा धोका असलेली ठिकाणे, ओढे-नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे. घरांच्या परिसरात भेगा, माती घसरणे किंवा दरडीची कोणतीही चिन्हे दिसल्यास तात्काळ महसूल विभाग, ग्रामपंचायत किंवा पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापनकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments