सातारा जिल्ह्यात सरासरी 30.8 मि.मी. पावसाची नोंद; महाबळेश्वर-जावळीत मुसळधार, रस्ते धोकादायक

महाबळेश्वर-जावळीत 

मुसळधार;

'स्लिप सर्कल'मुळे रस्ते 

धोकादायक

सातारा जिल्ह्यात सरासरी 30.8 मि.मी. पावसाची नोंद

संतोष शिराळे | सातारा

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून 8 जुलै रोजी जिल्ह्यात सरासरी 30.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरी 238.2 मि.मी. पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे 174.4 मि.मी. (एकूण 1226.0 मि.मी.), तर जावळी (मेढा) येथे 105.0 मि.मी. (एकूण 605.2 मि.मी.) इतकी झाली आहे. वाई येथे 37.2 मि.मी., सातारा 29.8 मि.मी., पाटण 28.7 मि.मी., खंडाळा 22.7 मि.मी., कोरेगाव 21.5 मि.मी., कराड 16.2 मि.मी., खटाव 12.0 मि.मी., फलटण 7.4 मि.मी. आणि माण तालुक्यात 3.6 मि.मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे सातारा–कास–बामणोली–तापोळा मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 26 व्या किलोमीटरवरील (97/400) सुमारे 50 मीटर लांबीचा रस्त्याचा अर्धा भाग 'स्लिप सर्कल'मुळे खचू लागला असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पाटण तालुक्यातील खुडूपलेवाडी–गावडेवाडी ग्रामरस्त्यावर दरड हटविणे आणि नाली साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ भागातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments