जावळीत दरडींचा धोका वाढला; बाहुलेमध्ये डोंगर खचला, बोंडारवाडीत घरांमध्ये झरे, प्रशासनासमोर मोठे आव्हान

जावळी तालुक्यात 

दरडींचा धोका वाढला

बाहुलेमध्ये डोंगर खचला

बोंडारवाडीत घरांमध्ये झरे

प्रशासनासमोर मोठे आव्हान?

टोम्पेवाडी येथे रस्त्याचा भाग खचला

संतोष शिराळे, सातारा |

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडप्रवण जावळी तालुक्यात धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. बाहुले गावात डोंगराचा काही भाग कोसळल्याने प्रशासनाने तातडीने हालचाल करत ९ कुटुंबांतील २३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.

दरम्यान, दरडप्रवण बोंडारवाडी गावातही परिस्थिती गंभीर बनली आहे. सततच्या पावसामुळे काही घरांच्या परिसरातून नैसर्गिक झरे वाहू लागल्याने जमिनीची पकड कमकुवत झाली आहे. संभाव्य दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन ओढ्यालगत राहणाऱ्या ८ नागरिकांना गावातील मंदिरात सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

जावळी तालुका दरडप्रवण म्हणून ओळखला जात असतानाही अशा संवेदनशील गावांमध्ये कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना अद्याप पूर्णत्वास न आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक पावसाळ्यात स्थलांतराची वेळ येत असल्याने धोकादायक वाड्यांचे पुनर्वसन, दरड प्रतिबंधक उपाययोजना आणि सातत्यपूर्ण भूवैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

सध्या महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे.

- जावळीत दरडींचा वाढता धोका; बाहुले गावात डोंगराचा भाग कोसळला.

- बाहुलेतील ९ कुटुंबांतील २३ नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर.

- बोंडारवाडीत घरांमध्ये नैसर्गिक झरे; ८ नागरिकांना मंदिरात हलविले, प्रशासनासमोर पुनर्वसनाचे आव्हान.

महाबळेश्वर-तापोळा मार्गावर झाड कोसळल्यानंतर झोळाची खिंडीत दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा मार्गावर सोमवारी संध्याकाळपासून अडथळ्यांची अक्षरशः शर्यत सुरू झाली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कारवी आळा येथे भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. प्रशासनाने झाड हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले असतानाच पुढे झोळाची खिंड येथे डोंगराचा मोठा ओसरा रस्त्यावर आल्याने मार्ग पुन्हा बंद झाला.

टोम्पेवाडी येथे रस्त्याचा मोठा भाग खचला, घरांनाही धोका

सततच्या मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यातील पानस फाटा–वहागाव मुख्य मार्गावरील टोम्पेवाडी येथे रस्त्याचा मोठा भाग खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील दळणवळण विस्कळीत झाले असून, रस्त्याच्या खाली असलेल्या घरांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.



Post a Comment

0 Comments