ब्रेकिंग न्यूज : सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा प्रभाव, महाबळेश्वर-पाटणमधील रस्ते बंद, धरणे ओव्हरफ्लो तर कोयनेत ७९ हजार क्युसेकची आवक

सातारा जिल्ह्यात

मुसळधार पावसाचा प्रभाव

महाबळेश्वर-पाटणमधील रस्ते बंद, मार्ग वळवले

कोयना धरणात ७९ हजार क्युसेकची आवक

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

संतोष शिराळे | सातारा

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रांवर १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने व रस्ते खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर प्रचंड आहे. विविध केंद्रांवर झालेली पावसाची नोंद : वालवण - १३४ मिमी, जोर -१३३ मिमी, सावर्डे-१२६ मिमी, सोळशी-१२१ मिमी, नवजा-११८ मिमी, काटी-११७ मिमी, ठोसेघर-११३ मिमी, प्रतापगड-१०७ मिमी, बामणोली-१०६ मिमी, तारळी धरण परिसर-१०५ मिमी, महाबळेश्वर-१०४.६ मिमी, कोयनानगर-९४ मिमी. या व्यतिरिक्त पाथरपुंज (९१ मिमी), धाईगरवाडी (८० मिमी), चाफळ (७५ मिमी) आणि सातारा शहरात २०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर परिसरात सध्या दाट धुके आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

सततच्या पावसामुळे कृष्णा, कोयना, तारळी, उरमोडी आणि वेण्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कोयना धरणात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयना धरणाची पाणीपातळी २१०१.०० फूट झाली असून धरणात ४४.५७ टीएमसी (४२.३५%) एकूण साठा झाला आहे. धरणात सध्या ७९,७०८ क्युसेक इतका मोठा येवा (पाण्याची आवक) सुरू आहे. सध्या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

धोम धरणात ५६.६७ टक्के, कण्हेर धरणात ७६.१४ टक्के, उरमोडी धरणात ५३.११ टक्के, तर तारळी धरणात ४१.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील मोठ्या सहा धरणांमध्ये एकूण ७०.४४ टीएमसी (४७.३६%) पाणीसाठा असून, मध्यम प्रकल्पांमध्ये ४.६० टीएमसी (५२.६३%) पाणी साठले आहे.

वीर धरण : वीर धरणाची पाणीपातळी वाढल्याने निरा नदीपात्रात ६,०३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे (४,६३७ क्युसेक सांडव्यावरून आणि १,४०० क्युसेक एस्केपमधून).

कण्हेर धरण : धरणात ७६% पाणीसाठा झाल्याने ८ जुलै रोजी रात्री ९ वाजता विद्युतगृहातून ६०० क्युसेक, तर उद्या ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता सांडव्यावरून २,००० क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जाईल. काळगाव व कुमठे प्रकल्प : पाटण तालुक्यातील काळगाव लघु पाटबंधारे धरण आणि कुमठे प्रकल्प १००% भरले असून, सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

दरड कोसळण्याचा आणि रस्ते खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने वाहतुकीचे मार्ग वळवले आहेत.

सातारा–कास–बामणोली–तापोळा–महाबळेश्वर मार्ग : रस्ता खचल्यामुळे हा मार्ग जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. हलकी वाहने मांगर–पारूट–झोळाची खिंड मार्गे वळवण्यात आली आहेत.

डिचोली–नवजा–हेळवाक (राज्य मार्ग १४८) : रस्ता खचल्याने वाहतूक कोयना नेहरू उद्यान–कामरगाव मार्गे वळवली आहे. 

गव्हाणवाडी फाटा ते मोरगिरी मार्ग : कुसरुंड गावाजवळील नाल्याला पूर आल्याने स्लॅब ड्रेनवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा मार्ग तात्पुरता बंद केला आहे.

तारळी नदीचा पूल पाण्याखाली : कराड तालुक्यातील इंदोली येथील तारळी नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली आहे.

हवामान विभागाचा इशारा आणि प्रशासनाचे आवाहन

पुढील ३ तासांचा अंदाज: सातारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना : 

 1. पूरग्रस्त पूल, ओढे आणि नाल्यांवरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

 2. नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे व आपले साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे.

 3. धबधबे, दरडप्रवण क्षेत्र आणि पूरग्रस्त भागांत पर्यटनासाठी जाणे टाळावे.

 4. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

Post a Comment

0 Comments