सातारा, जावळीत दरड व
भूस्खलनाचा वाढता धोका
सायघर, म्हाते-मुरा व आलवडीतील ३४९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
संतोष शिराळे | सातारा
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यात दरड व भूस्खलनाचा धोका गंभीर बनला आहे. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महसूल, पोलीस आणि ग्रामविकास विभागाने तातडीने कारवाई करत सायघर, म्हाते-मुरा आणि सातारा तालुक्यातील आलवडी येथील एकूण मिळून ३४९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे.
आज पहाटे सायघर येथे एका राहत्या घरावर दरड कोसळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार प्रवीण मुदगुल, गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच महसूल व ग्रामविकास विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. दरडीचा धोका लक्षात घेऊन ११ कुटुंबांतील ४५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. यापैकी एका कुटुंबाची शाळेत, तर उर्वरित १० कुटुंबांची नातेवाईकांकडे व्यवस्था करण्यात आली.
दरम्यान, म्हाते-मुरा येथे विविध ठिकाणी जमिनीला पडलेल्या भेगांची लांबी व संख्या वाढल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे संभाव्य भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन ४४ कुटुंबांतील २६४ नागरिकांना सुरक्षितस्थळी तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. यापूर्वी आलवडी येथील दरडप्रवण क्षेत्रातील ४० नागरिकांना पाटेघर व नावली येथे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने दरडप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, जमिनीला भेगा पडणे, माती घसरणे किंवा दरडीची चिन्हे दिसताच तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या परिस्थितीवर महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सातत्याने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील स्थलांतराची तयारी ठेवण्यात आली आहे.





0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!