कास रस्त्यावरील
सांबरवाडी नाकाबंदीत
सराईत गुन्हेगार जाळ्यात
देशी पिस्तूल, जिवंत काडतूससह १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
संतोष शिराळे | सातारा
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने धबधबे, घाटमाथा परिसर व नदीकाठच्या भागात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सातारा तालुका पोलिसांकडून सांबरवाडी येथे नाकाबंदी आणि मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई सुरू होती. दरम्यान, दि. ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता तोंडाला मास्क लावून एक युवक दुचाकीवरून कासच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नाकाबंदीवरील पोलिसांना चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने स्वतःची ओळख, वाहन परवाना व वाहनाची कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांना संशय आला. पंचांच्या उपस्थितीत त्याच्या होंडा ॲक्टिव्हा (क्रमांक एमएच-१२ ईबी-१२३९) या दुचाकीची झडती घेतली असता डिकीत एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दोन मोबाईल हँडसेट मिळून आले.
पोलिस तपासात संबंधित युवक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनु शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस उपनिरीक्षक सोनु शिंदे, पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, रायसिंग घोरपडे आणि अजित निकम यांनी सहभाग घेतला.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!