संजय गांधी, श्रावणबाळ व
इंदिरा गांधी निराधार योजना
लाभार्थ्यांनी २४ जुलैपूर्वी
हयातीचा दाखला जमा करावा
: तहसीलदार प्रवीण मुदगुल
दाखला न भरल्यास जुलै महिन्याची पेन्शन रोखली जाणार
ग्राम महसूल अधिकाऱ्यांना दवंडी देऊन जनजागृतीचे आदेश
संतोष शिराळे | मेढा
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी २४ जुलै २०२६ पर्यंत आपला ऑनलाईन हयातीचा दाखला (Life Certificate) अनिवार्यपणे सादर करावा, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी केले आहे. हयातीचा दाखला मुदतीत सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांची जुलै महिन्याची पेन्शन जमा होणार नसल्याने सर्व लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या अनुषंगाने सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात दवंडी देऊन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी आणि प्रमुख सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावून लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
लाभार्थ्यांनी जवळच्या महा ई-सेवा केंद्रात किंवा तहसील कार्यालय जावली (मेढा) येथे जाऊन 'Beneficiary Satyapan App' च्या माध्यमातून ऑनलाईन हयातीचा दाखला काढून घ्यावा. त्यानंतर त्या दाखल्याची छापील प्रत तहसील कार्यालय, जावली (मेढा) येथील संजय गांधी शाखेत जमा करणे आवश्यक आहे.
तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी सांगितले की, २४ जुलै २०२६ पर्यंत हयातीचा दाखला जमा न करणाऱ्या लाभार्थ्यांची जुलै २०२६ महिन्याची पेन्शन जमा होणार नाही. त्यामुळे कोणताही लाभार्थी वंचित राहू नये म्हणून मुदतीपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.
सदर योजनांतील बहुतांश लाभार्थी हे वृद्ध, दिव्यांग व निराधार नागरिक असल्याने त्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी गावपातळीवर तलाठी आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य करावे, असेही तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी आवाहन केले आहे. हे काम अत्यंत महत्त्वाचे व मुदतीचे असल्याने कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असेही तहसीलदार प्रवीण मुदगुल यांनी स्पष्ट केले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!