जेजुरीजवळ ट्रक दिंडीत घुसला; सांगलीच्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू ; 15 हून अधिक जखमी, आषाढी वारीवर काळाचा घाला

जेजुरीजवळ ट्रक दिंडीत घुसला

सांगलीच्या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

15 हून अधिक जखमी

आषाढी वारीवर काळाचा घाला

जेजुरी | प्रतिनिधी

आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात अत्यंत भीषण अपघात झाला. ज्ञानोबा-तुकारामांच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत वारीचा शिधा व साहित्य घेऊन जाणारा ट्रक अचानक अनियंत्रित होऊन घुसला. या दुर्दैवी अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी असून त्या सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेमुळे सांगलीसह संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. संतप्त वारकऱ्यांनी ट्रकचालकाला पकडून मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी वारकऱ्यांना तातडीने जेजुरीसह परिसरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक हा नांदेड जिल्ह्यातील असून वारीसाठी आवश्यक शिधा व साहित्य घेऊन जात होता. चालकाचे वय सुमारे 70 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. तापाच्या गोळ्या घेतल्यामुळे चालकाला ग्लानी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक दावा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी येथील रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. तसेच, या दुर्घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले असताना घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Post a Comment

0 Comments