माऊलींच्या पालखीसाठी सातारा पोलीस सज्ज २,६०० हून अधिक पोलीस-होमगार्डांचा चोख बंदोबस्त;२४ सराईत गुन्हेगार तडीपार, आणखी १६ जणांवर कारवाई प्रस्तावित; साध्या वेशातील पथके, बॉम्ब शोधक पथक आणि एसआरपीएफ तैनात

माऊलींच्या पालखीसाठी 

सातारा पोलीस सज्ज 

२,६०० हून अधिक पोलीस-होमगार्डांचा चोख बंदोबस्त

२४ सराईत गुन्हेगार तडीपार, आणखी १६ जणांवर कारवाई प्रस्तावित

साध्या वेशातील पथके, बॉम्ब शोधक पथक आणि एसआरपीएफ तैनात

सातारा | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. १५ ते १८ जुलै या कालावधीत पालखी सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असून, लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात २,६०० हून अधिक पोलीस, होमगार्ड आणि विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.

पालखी सोहळा निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील २४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. पालखी मार्गावर चोऱ्या, पाकिटमारी, महिलांची छेडछाड आणि इतर गुन्हे रोखण्यासाठी साध्या वेशातील गुन्हे शोध पथके (डीबी) सातत्याने गस्त घालणार आहेत.

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस, ९७ महिला पोलीस, १,१०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, दोन आरसीपी प्लाटून आणि एक बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तैनात करण्यात आले आहे. याशिवाय बंदोबस्त अधिक मजबूत करण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली येथून प्रत्येकी १४० पोलीस, रायगड येथून १० पोलीस, ३० अतिरिक्त वाहतूक पोलीस, १८ अधिकारी आणि एसआरपीएफची एक कंपनी साताऱ्यात दाखल होणार आहे.

पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंदोबस्तावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या पाकिटमारांवर, महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर तसेच बेदरकार वाहन चालवून वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढविणे आणि संशयास्पद व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.

यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देत सातारा पोलीस प्रशासनाने सर्वंकष नियोजन केल्याचे या बंदोबस्तावरून स्पष्ट होत आहे.

Post a Comment

0 Comments