महाबळेश्वरामधील भोसे येथे पर्यटकाची मारहाणीत हत्या; पाचगणी पोलिसांनी केली चार आरोपींना अटक; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

महाबळेश्वरामधील भोसे येथे

पर्यटकाची मारहाणीत हत्या

पाचगणी पोलिसांनी केली चार आरोपींना अटक 

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

संतोष शिराळे | सातारा 

महाबळेश्वर तालुक्यातील भोसे गावात पुणे जिल्ह्यातील एका पर्यटकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराकडे संशयास्पदरीत्या डोकावल्याचा संशय आल्याने स्थानिकांनी कायदा हातात घेत अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) याला लाकडी काठ्या व दगडांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अक्षय जाधव हा त्याचे मित्र विशाल जाधव व इतरांसह पर्यटनासाठी भोसे येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आला होता. रात्री अक्षयने मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला खोलीत झोपवून बाहेरून कडी लावली आणि ते टेरेसवर गेले. काही वेळानंतर परत आल्यावर अक्षय खोलीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्याचा शोध घेत असताना हॉटेलपासून काही अंतरावर गर्दी दिसली. तेथे जाऊन पाहिले असता काही जण अक्षयला काठ्या आणि दगडांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले. मित्रांनी त्याची सुटका करून तातडीने रुग्णालयात दाखल केले.

प्रथम अक्षयला पाचगणी, त्यानंतर वाई येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बारामती येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी सूर्यकांत गोळे (रा. भोसे), अविनाश भोसले (रा. बावधन), राहुल राजपुरे (रा. कनूर) आणि अमोल वाडकर (रा. चिखली) यांना अटक केली आहे. चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. पवार पुढील तपास करत आहेत.

घराच्या दिशेने डोकावल्याचा संशय आल्याने हा वाद झाला असल्याचे माहिती समोर येत आहे. मात्र या कारणावरून एखाद्या व्यक्तीला बेदम मारहाण करून जीव घेणे ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेमुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घटनेमागील नेमके कारण, मारहाणीचा क्रम आणि सर्व परिस्थितीचा सखोल तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments