साताऱ्यात NCMC कार्ड आणि मतदार पडताळणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांनी घेतला दुहेरी सुविधांचा लाभ

साताऱ्यात NCMC कार्ड

आणि मतदार पडताळणी 

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 नागरिकांनी घेतला दुहेरी सुविधांचा लाभ

नगराध्यक्ष अमोल मोहिते व नियोजन सभापती अशोक शेडगे यांच्या यांच्यावतीने आयोजन

सातारा | प्रतिनिधी

सातारा शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी डिजिटल वाहतूक सुविधा आणि मतदार यादी अद्ययावतीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि नियोजन सभापती अशोक शेडगे यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ मंगल कार्यालय, यादोगोपाळ पेठ येथे NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) नोंदणी शिबिर तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत मतदार पडताळणी व गणनापत्र भरण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास नगराध्यक्ष अमोल मोहिते, नियोजन सभापती अशोक शेडगे, एसटी महामंडळाच्या शिवानी केंजळे, ढोल्या गणपती गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव, बीएलओ प्रिया सराटे, राजे मॅडम, गणेश टोपे, रवींद्र काळे तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.



यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाचे महत्त्व स्पष्ट करत प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार गणनापत्र अचूक भरावे, मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बीएलओंना सहकार्य करावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी NCMC कार्डाच्या विविध सुविधांची माहिती देताना हे कार्ड एसटी, मेट्रो, लोकल रेल्वे, पार्किंग, टोल, रिटेल व्यवहार आणि इंधन भरणे अशा विविध सेवांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. भविष्यातील डिजिटल व्यवहारांसाठी हे कार्ड महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिरात NCMC कार्डासाठी नोंदणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, तसेच SIR अभियानांतर्गत मतदार गणनापत्र भरणे, मतदार माहितीची पडताळणी आणि अद्ययावतीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. बीएलओ आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करत अर्ज तत्परतेने पूर्ण करून घेतले.

एकाच ठिकाणी दोन महत्त्वाच्या नागरी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. डिजिटल व्यवहारांना चालना देणे आणि मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हा संयुक्त उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments