सांबरवाडीतील भूस्खलनामुळे
कास पाणीपुरवठा योजनेच्या
मुख्य पाईपलाईनला गळती
तीन दिवसांपासून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली घटनास्थळाची पाहणी
संतोष शिराळे | सातारा
सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गळती (लिकेज) झाली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून गेल्या तीन दिवसांपासून युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.
सतत पडणारा मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असले, तरी नगरपालिका कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेऊन गळती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, राजू गोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम दर्जेदार पद्धतीने आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, "गेल्या तीन दिवसांपासून नगरपालिका कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. सततच्या पावसामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्या तरी कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र काम करून गळती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे."
काम पूर्ण होताच कास पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, तोपर्यंत नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!