अतिवृष्टीचा धोका; महाबळेश्वर-पाचगणीतील सर्व पर्यटनस्थळे १० जुलैपर्यंत बंद, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

अतिवृष्टीचा धोका

महाबळेश्वर-पाचगणीतील पर्यटनस्थळे १० जुलैपर्यंत बंद

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई : एपीआय दिलीप पवार

संतोष शिराळे |सातारा

सातारा जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाई उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी १० जुलै २०२६ पर्यंत परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिला आहे.

बंद असलेली प्रमुख पर्यटनस्थळे

टेबललँड (पाचगणी), आर्थर सीट, केट्स पॉइंट, एलिफंट्स हेड पॉइंट, विल्सन पॉइंट, सावित्री पॉइंट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड परिसर, तापोळा (मिनी महाबळेश्वर), तसेच महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील इतर सर्व पर्यटनस्थळे.

दरम्यान, सर्व पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून धोकादायक ठिकाणी 'प्रवेश निषिद्ध' आणि 'धोकादायक क्षेत्र'चे फलक लावण्यात आले आहेत. घाटरस्त्यांवर वाहने थांबविण्यास बंदी घालण्यात आली असून, पूरस्थिती निर्माण झाल्यास संबंधित मार्ग तातडीने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येणार आहेत. हा आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत लागू करण्यात आला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळणे, भूस्खलन, रस्ते खचणे आणि अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांनी या कालावधीत पर्यटनासाठी येणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments