चार वर्षांपूर्वीच दिला होता इशारा;
तरीही प्रशासन झोपेतच!
ओढा बुजवल्याने पार्टेवाडीत घरांमध्ये घुसले पुराचे पाणी
संतोष शिराळे | सातारा
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जावळी तालुक्यातील मौजे खर्शीबारामुरे (पार्टेवाडी) येथे नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे. नैसर्गिक ओढा बुजवल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरून अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, ही आपत्ती अचानक आलेली नसून याबाबत ग्रामस्थांनी २०२२ पासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे.
पार्टेवाडी परिसरातील डोंगरमाथ्यावरून येणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्वी गट क्रमांक ६७१ मधून वाहत होता. मात्र, संबंधित शेतकरी वसंत संभू पार्टे यांनी या नैसर्गिक ओढ्यात भराव टाकून तो बुजवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी आपला नैसर्गिक मार्ग बदलून रस्ते, शेते आणि घरांमध्ये घुसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यंदा सुरू असलेल्या अतिवृष्टीत परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून लक्ष्मण शंकर बिरामणे यांच्या घरासह परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत.
२०२२ पासून तक्रारी; तरीही कारवाई नाही
ग्रामस्थांनी २०२२ मध्ये ग्रामपंचायत, तहसीलदार, महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रारी देऊन नैसर्गिक ओढा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्या अर्जांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, ओढा बुजवल्यामुळे भविष्यात घरे, शेती आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
तक्रारीनंतर महसूल विभागाने स्थळपाहणी केली होती. तहसीलदार जावली यांनी दिलेल्या नोटीसमध्येही गट क्रमांक ६७१ मधील नैसर्गिक ओढा भराव टाकून बुजविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये संबंधितांना ओढा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच भविष्यात जीवित किंवा वित्तहानी झाल्यास संबंधित व्यक्ती जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या नोटिशीनंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. परिणामी, आज त्याच दुर्लक्षाची मोठी किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागावरही प्रश्न
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने परिस्थितीची दखल घेतली नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे पुराचे पाणी थेट वस्तीमध्ये घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
पार्टेवाडीतील ग्रामस्थांनी नैसर्गिक ओढा तात्काळ पूर्ववत करावा, अतिक्रमण हटवावे, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना भरपाई द्यावी आणि चार वर्षे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
ऐन पावसाळ्यात समोर आलेली ही घटना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत असून, आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!