महाबळेश्वरच्या नावली गावात अतिवृष्टीमुळे जमीन खचली; प्रशासन अलर्ट, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार सचिन म्हस्के

महाबळेश्वरच्या नावली गावात 

अतिवृष्टीमुळे जमीन खचली

प्रशासन अलर्ट, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी 

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार सचिन म्हस्के

संतोष शिराळे, सातारा :

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात शनिवारी सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावाच्या वरच्या बाजूचा काही भाग खचून झाडांसह मातीचा मोठा मलबा रस्त्यावर वाहून आला. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम सुरू केले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन म्हस्के यांनी केले आहे.

खचलेल्या भागाजवळच गावाची पाण्याची टाकी असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून पाण्याच्या टाकीची प्रत्यक्ष पाहणी सुरू असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या ठिकाणाजवळील चार घरांपैकी एक घर आधीपासूनच बंद असून उर्वरित तीन घरांतील रहिवाशांना सुरक्षिततेच्या कारणास्तव समजावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सध्या संपूर्ण गावाला कोणताही तातडीचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर किंवा अन्य माध्यमांतून अफवा पसरवू नयेत आणि केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Post a Comment

0 Comments