मिरचीपूड टाकून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपीला न्यायालयाचा दणका; १ महिना कारावास, २६ हजार रुपयांचा दंड


मिरचीपूड टाकून

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या

आरोपीला दंडाची शिक्षा

१ महिना कारावास, २६ हजार रुपयांचा दंड

सातारा | प्रतिनिधी

रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटण व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत रोख रक्कम व मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १ महिना साधी कैद व ₹२६ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.

हा प्रकार ११ ऑक्टोबर २०२० रोजी अंभेरी घाट परिसरात घडला होता. फिर्यादी फिरोज महमद कसाई हे दुकान बंद करून रहिमतपूरकडे जात असताना आरोपी विशाल कैलास पाटोळे (रा. औंध, ता. खटाव) याने त्यांची मोटारसायकल अडवून डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर झाडीत ओढून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत रोख रक्कम, सॅमसंग मोबाईल व आधारकार्ड असा सुमारे ३५,२०० रुपये किमतीचा ऐवज जबरीने लुटला होता.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अनुराधा निंबाळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. खटल्यात रहिमतपूर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल विनोद मोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments