पश्चिमेकडे मुसळधार,
तर माणदेश अजूनही
पावसाच्या प्रतीक्षेत!
संतोष शिराळे | सातारा
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असून कृष्णा, कोयना आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच्या नेमक्या उलट चित्र जिल्ह्याच्या पूर्व भागात पाहायला मिळत आहे.
माण आणि खटाव तालुक्यांसह माणदेशावर अद्यापही दमदार पावसाची कृपादृष्टी झालेली नाही. ऐन पावसाळ्यातही माण नदीचे पात्र कोरडेठाक असून नदीपात्रातील ठिकठिकाणी बांधलेले बंधारे पाण्याअभावी रिकामेच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून खरीप हंगामातील पेरण्या पुरेशा पावसाअभावी अद्यापही रखडल्या आहेत.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा अद्याप सुरू असून पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. एकीकडे पश्चिम भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, दुसरीकडे माणदेशातील नागरिक पावसाच्या एका जोरदार सरीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, कराड आणि कोकण परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर दिवाळीनंतर चरण्यासाठी त्या भागात स्थलांतरित झालेले माण तालुक्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन पुन्हा माणदेशाकडे परतू लागले आहेत.
सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना ही एका टोकाला पावसाने न्हालेला डोंगराळ पश्चिम भाग आणि दुसऱ्या टोकाला दुष्काळाची झळ सोसणारा पूर्व भाग अशी आहे. आजही हे चित्र कायम असून पश्चिमेकडे नद्या दुथडी भरून वाहत असताना, माणदेशातील शेतकरी आणि नागरिक मात्र आकाशाकडे डोळे लावून दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!