ब्रेकिंग | सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर! रस्ते खचले, झाडे कोसळली, गावांचा संपर्क धोक्यात, धरणांमध्ये वाढती आवक

सातारा जिल्ह्यात 

पावसाचा कहर!

रस्ते खचले, झाडे कोसळली

गावांचा संपर्क धोक्यात

धरणांमध्ये पाण्याची आवक

संतोष शिराळे | सातारा

गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती, भूस्खलन, रस्ते खचणे, झाडे कोसळणे आणि घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाबळेश्वर, जावळी, पाटण, वाई आणि कोयनानगर परिसराला सर्वाधिक फटका बसला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

🚨 ठळक घडामोडी

म्हातेमुरा (जावळी) येथे भूस्खलनामुळे जमिनीला मोठ्या भेगा पडल्या. धोका लक्षात घेऊन १६ कुटुंबांतील ६१ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.

दरे बुद्रुक (जावळी) येथे अतिवृष्टीमुळे ३ घरांच्या भिंती कोसळल्या.

रेंडीमुरा येथे शाळेचे ३ पत्रे उडाले, तर महिगाव येथे गाईंचा गोठा कोसळला. पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोयनानगर-पाबळनाला धबधबा मार्ग रस्ता खचल्याने बंद करण्यात आला असून नवजा, कामरगाव, मनाईनगर गावांचा संपर्क प्रभावित झाला आहे. पर्यटकांनाही या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

कोयना-हुबरळी-तोरणे (पाटण) मार्गावर दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोचारेवाडी (पाटण) येथेही दरड हटविण्याचे काम सुरू असून यंत्रणा सतर्क आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील चतुरबेट गावाचा संपर्क तुटला, तर संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अंबवडे (वाघोली) येथे महामार्गावर मोठे बाभळीचे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

वाई तालुक्यातील जांभळी येथील आदिवासी पाड्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून परिस्थिती चिंताजनक आहे.

🔴 मुसळधार पावसाने घर कोसळले; कुटुंब बेघर

सततच्या मुसळधार पावसामुळे काटवली येथील ग्रामस्थ तुकाराम श्रीपती बेलोशे यांचे राहते घर पूर्णपणे कोसळून कुटुंब बेघर झाले. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काटवली सजाचे तलाठी प्रशांत माने यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार सुमारे ₹३ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

🌊 धरणांमध्ये मोठी आवक

सततच्या पावसामुळे कोयना धरणात ९३,०२० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. इतर प्रमुख धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे.


🌧️ कास धरण तुडुंब

मुसळधार पावसानंतर कास धरण पूर्ण भरून सांडव्यावरून मनमोहक प्रवाह सुरू झाला असून हा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाने मात्र धरण परिसरात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

⚠️ प्रशासनाचे आवाहन

हवामान विभागाने पुढील २४ तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदी, ओढे, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जावळीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, गटविकास अधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments