साताऱ्यात पावसाचा धुमाकूळ; ठोसेघर तलाव ओसंडला, धबधबे दणाणले, धरणांत झपाट्याने वाढता जलसाठा; पुढील तीन तास 'रेड अलर्ट'

सातारा जिल्ह्यात 

पावसाचा धुमाकूळ

ठोसेघर तलाव ओसंडला, धबधबे दणाणले 

धरणांत झपाट्याने वाढता जलसाठा

पुढील तीन तास 'रेड अलर्ट'

संतोष शिराळे, सातारा | 

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या, धरणे, तलाव आणि धबधबे तुडुंब भरू लागले असून संपूर्ण जिल्हा हिरवाईने नटला आहे. ठोसेघर धबधबा आणि लिंगमळा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास 'रेड अलर्ट' जारी केल्याने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तारळी नदीवरील ठोसेघर लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वेगाने वाहू लागले आहे. तलावाच्या सांडव्यावरून फेसाळत वाहणारे पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर ठोसेघर धबधबा पूर्ण क्षमतेने दणाणून कोसळत असून रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हजारो पर्यटकांनी वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटला. महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे लिंगमळा धबधब्याचा प्रवाह प्रचंड वाढला असून दाट धुक्याच्या सान्निध्यात पर्यटक निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद घेत आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्येही पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. कोयना धरणात २२.९२ टीएमसी (१७.८० टीएमसी उपयुक्त) जलसाठा झाला असून ४४,०९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून अद्याप विसर्ग करण्यात आलेला नाही.

जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, कण्हेर, धोम, उरमोडी, तारळी, बलकवडी, वांग यांसह अनेक धरणांमध्येही जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. काही लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून सिंचनासाठीची परिस्थिती समाधानकारक बनत आहे. जलसाठ्यात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी तसेच कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड आणि कोयना या उपनद्यांवरील सिंचनासाठीच्या उपसा योजनांवरील बंदी शिथिल करण्यात आली आहे. संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान विभागाच्या नाऊकास्टनुसार सातारा, पुणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

धबधबे आणि तलाव परिसरात मोठी गर्दी होत असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, सेल्फीसाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, नदीपात्र व सांडव्याजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने आगामी २४ तासांत धरणांतील जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता असून, निसर्गाचे रौद्र आणि रमणीय असे दोन्ही रूप सध्या अनुभवायला मिळत आहे.



Post a Comment

0 Comments