शिरवळच्या मुख्य रस्त्यावर मालवाहू वाहनांचा विळखा विद्यार्थी, महिला व प्रवाशांचा जीव धोक्यात कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांकडून मागणी

शिरवळच्या मुख्य रस्त्यावर

मालवाहू वाहनांचा विळखा

विद्यार्थी, महिला व प्रवाशांचा जीव धोक्यात

कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांकडून मागणी

संतोष शिराळे, सातारा |

खंडाळा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या शिरवळ शहरात आशियाई महामार्गालगतच्या मुख्य रस्त्यावर मालवाहू ट्रक आणि कंटेनरमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी ९ ते ११ या शाळा व कार्यालयीन गर्दीच्या वेळेत मुख्य रस्त्यावरच कंटेनर उभे राहत असल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.

औद्योगिक परिसरातील गोदामे व दुकानांमध्ये मालाची चढ-उतार सुरू असताना ट्रक थेट मुख्य रस्त्यावर उभे केले जातात. परिणामी वाहतूक कोंडी, लांबच लांब वाहनांच्या रांगा आणि अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी काही वाहनांवर कारवाई सुरू केली असली तरी ती केवळ तात्पुरती ठरत आहे. काही दिवस शिस्त दिसून येते, मात्र पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, एमआयडीसी, व्यापारी संघटना आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांनी संयुक्त नियोजन करून मुख्य रस्त्यावर माल उतरविण्यास बंदी, स्वतंत्र लोडिंग-अनलोडिंग झोन, निश्चित वेळापत्रक आणि नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

शिरवळप्रमाणेच पारगाव-खंडाळा, वेळे, पाचवड आणि आनेवाडी टोल नाका परिसरातही मुख्य रस्त्यावर मालवाहू वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः आनेवाडी टोल नाक्यावर दोन्ही लेनमध्ये कंटेनर उभे राहत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणीही नियमित कारवाई करून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी, प्रवासी व नागरिकांनी केली आहे. शिरवळसह संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग परिसरातील अशा बेशिस्त पार्किंगवर सातत्याने कारवाई झाली, तर वाहतूक कोंडी कमी होऊन अनेक संभाव्य अपघात टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments