किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यांचा सोमवारी मिल रोलर पूजन सोहळा; खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

किसन वीर व खंडाळा साखर

कारखान्यांचा सोमवारी

मिल रोलर पूजन सोहळा

खासदार नितीनकाका पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

भुईंज | प्रतिनिधी :

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, भुईंज आणि किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योग, खंडाळा यांच्या सन २०२६-२७ गाळप हंगामाच्या मिल रोलर पूजनाचा सोहळा सोमवार, दि. ६ जुलै रोजी उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रतिमा नितीन पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकानुसार, खंडाळा कारखान्यात सकाळी १० वाजता, तर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात दुपारी १२ वाजता मिल रोलर पूजन होणार आहे.

प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने काटकसरीने व पारदर्शक पद्धतीने कारभार केला असून, ऊस उत्पादकांच्या ऊस बिलाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू करण्यासाठी कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात असून, दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालावेत यासाठी तोडणी व वाहतूक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना प्रमोद शिंदे यांनी किसन वीर आणि खंडाळा कारखान्यांसाठी येणारा काळ नवी आशा आणि प्रगतीचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या मिल रोलर पूजन सोहळ्यास सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील तसेच दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments