निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याचे वृत्त निराधार ; वाद मिटवण्यासाठी केलेल्या मध्यस्थीदरम्यान झाली झटापट ; सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी पुढे सरसावले ; पोलिसांत तक्रार दाखल, संबंधित युवकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू

निवासी उपजिल्हाधिकारी 

नागेश पाटील यांना 

मारहाण झाल्याचे वृत्त निराधार

वाद मिटवण्यासाठी केलेल्या मध्यस्थीदरम्यान झाली झटापट

सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला वाद थांबविण्यासाठी पुढे सरसावले

पोलिसांत तक्रार दाखल, संबंधित युवकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू

सातारा | प्रतिनिधी

सातारा शहरातील नगरपालिकेच्या परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याच्या चर्चेला स्वतः नागेश पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. "मला मारहाण झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही," असे त्यांनी स्पष्ट करत, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता काही मद्यधुंद युवकांनी आपल्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सातारा नगरपालिकेजवळील एका हॉटेलमध्ये काही युवकांमध्ये जोरदार वाद सुरू होता. वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागेश पाटील यांनी प्रथम सातारा शहर पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.

मात्र पोलिस येईपर्यंत वाद अधिक चिघळत असल्याचे पाहून त्यांनी कोणत्याही पदाचा आव न आणता स्वतः पुढे होत संबंधित युवकांना शांत करण्याचा आणि हिंसक प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही मद्यधुंद युवकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत झटापट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

काही वेळातच सातारा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर नागेश पाटील यांनीही संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या घटनेबाबत बोलताना नागेश पाटील म्हणाले, "सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीला मारहाण होत असताना मी प्रथम पोलिसांना कळविले. मात्र तोपर्यंत प्रकार सुरूच असल्याने पुढे जाऊन तो थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याशी झटापट झाली; पण मला मारहाण झाल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नाही."

या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे, हस्तक्षेप करताना उपस्थित युवकांना किंवा नागरिकांना नागेश पाटील हे निवासी उपजिल्हाधिकारी असल्याची कल्पना नव्हती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी नागरिक म्हणून पुढाकार घेतला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होती.

दरम्यान, या घटनेनंतर काही माध्यमांमधून निवासी उपजिल्हाधिकारी यांना मारहाण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र स्वतः नागेश पाटील यांनी ते फेटाळून लावत, प्रत्यक्षात मध्यस्थी करताना किरकोळ झटापट झाली होती, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे "मारहाण" नव्हे, तर सार्वजनिक वाद शांत करण्यासाठी केलेल्या मध्यस्थीदरम्यान झालेली झटापट म्हणून पाहिले जात आहे. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून संबंधित युवकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments