कास पठारावर विंटेज मोटारसायकलींची दिमाखदार परेड; २४ व्या इंटरनॅशनल येझदी–जावा डेचे उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन

कास पठारावर

विंटेज मोटारसायकलींची 

दिमाखदार परेड

२४ व्या इंटरनॅशनल येझदी–जावा डेचे खासदार उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन

संतोष शिराळे |सातारा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास पठारावर रविवारी विंटेज मोटारसायकलप्रेमींचा अनोखा उत्सव रंगला. Yezdi Jawa Owners Club Maharashtra यांच्या वतीने आयोजित २४ व्या इंटरनॅशनल येझदी–जावा डे कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या शेकडो रायडर्स आणि दुर्मिळ क्लासिक मोटारसायकलींमुळे कास परिसराला ऐतिहासिक वैभवाची झळाळी लाभली.

उद्घाटनानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध राज्यांतून आलेल्या मोटारसायकलप्रेमींशी संवाद साधत विंटेज मोटारसायकलींची पाहणी केली. 

यावेळी उदयनराजेंनी सांगितले की, मोटारसायकल हे केवळ प्रवासाचे साधन नसून इतिहास, परंपरा आणि जिव्हाळा जपणारी एक संस्कृती आहे. अशा उपक्रमांमुळे जुन्या वाहनांचा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचतो आणि भारतीय मोटारसायकल संस्कृतीचा इतिहास जिवंत राहतो.

या सोहळ्यात १९५६ सालापासूनच्या दुर्मिळ, विंटेज आणि ऐतिहासिक येझदी–जावा मोटारसायकलींचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले होते. अनेक दशकांपासून जतन करून ठेवलेल्या या मोटारसायकलींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रत्येक वाहनामागील जपणूक, मेहनत आणि समर्पणाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कौतुक केले.

कार्यक्रमात कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, पुणे, मुंबई, बारामती तसेच कर्नाटक राज्यातून १५० हून अधिक क्लासिक येझदी–जावा मोटारसायकली सहभागी झाल्या होत्या. या मोटारसायकलींनी आपल्या दर्जेदार अभियांत्रिकी, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि समृद्ध वारशाची साक्ष उपस्थितांना अनुभवायला दिली.

यावेळी प्रसिद्ध ऑटोमोबाईल पत्रकार आदिल जल दारुखानावाला, यशराज पाटील, समीर मकानदार, सनी भोसले, शेखर चव्हाण, रोहित लाड, अमोल पाटुकले यांच्यासह मोठ्या संख्येने देशभरातील रायडर्स उपस्थित होते.

विंटेज मोटारसायकलप्रेमींचा उत्साह, ऐतिहासिक वाहनांचे वैभव आणि सह्याद्रीच्या निसर्गरम्य सान्निध्यामुळे कास पठारावरील हा सोहळा राज्यातील मोटारसायकलप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments