कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टीचा कहर! दरेगावापुढील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला; कांदाटी खोरे संकटात, शेकडो एकर शेती गेली वाहून

कांदाटी खोऱ्यात

अतिवृष्टीचा कहर!

दरेगावापुढील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला

शेकडो एकर शेती वाहून गेल्याने शेतकरी संकटात

संतोष शिराळे | सातारा

सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने आता भीषण रूप धारण केले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरेगावपुढील कांदाटी खोऱ्यात अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, मोठमोठी झाडे उन्मळून पडणे, रस्ते आणि पूल खचणे अशा घटनांची मालिका सुरू असून दरेगावपुढील तब्बल १६ गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

या गावांतील हजारो नागरिक गेल्या चार दिवसांपासून वीज, मोबाईल नेटवर्क आणि वाहतूक सुविधांपासून वंचित आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून काही पुलांना तडे गेल्याने तसेच ते खचल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, आरोग्य सुविधा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही ठप्प झाला आहे.

सततच्या पावसामुळे कांदाटी खोऱ्यातील शेकडो एकर भातशेती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये गाळ साचला असून शेतीचे स्वरूपच बदलून गेले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे.

दरम्यान, मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेले नागरिक तसेच पुणे आणि इतर भागांतून पर्यटनासाठी आलेले अनेक पर्यटकही या भागात अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून संपर्क तुटलेले रस्ते तातडीने सुरू करावेत, वीजपुरवठा आणि मोबाईल सेवा पूर्ववत कराव्यात तसेच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका अद्याप कायम असून परिस्थिती गंभीर बनली आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने कांदाटी खोऱ्यातील नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. प्रशासनाने तातडीने यंत्रणा सक्रिय करून संपर्क तुटलेल्या १६ गावांपर्यंत मदत पोहोचवावी, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments