सातारा जिल्ह्यात

पावसाने घेतली विश्रांती

महाबळेश्वरमध्ये दाट धुके,

कोयना धरणात 48.33 टक्के उपयुक्त पाणीसाठा

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात रविवारी (12 जुलै) दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. सातारा, महाबळेश्वर आणि कोयना परिसरात दिवसभर पावसाची नोंद झाली नसली, तरी महाबळेश्वरमध्ये दाट धुक्यामुळे वातावरण पूर्णपणे ढगाळ राहिले.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सातारा शहरात कमाल तापमान 29.7 अंश सेल्सिअस, तर सापेक्ष आर्द्रता 66 टक्के नोंदविण्यात आली. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत पावसाची नोंद शून्य मिमी झाली.

दरम्यान, महाबळेश्वरमध्ये कमाल तापमान 21.8 अंश सेल्सिअस इतके राहिले. येथे दिवसभर दाट धुक्याची चादर पसरलेली होती आणि आकाश पूर्णपणे झाकोळलेले होते. सापेक्ष आर्द्रता 96 टक्के नोंदविण्यात आली असून पावसाची नोंदही शून्य मिमी झाली.

कोयना धरणातील पाणीसाठा वाढ कायम

सायंकाळी 5 वाजेच्या नोंदीनुसार, कोयना धरणाची पाणीपातळी 2111 फूट 03 इंच (643.590 मीटर) इतकी झाली आहे. धरणात 53.53 टीएमसी (50.85 टक्के) एकूण, तर 48.40 टीएमसी (48.33 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

आज कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली नाही. हंगामातील एकूण पर्जन्यमान कोयना – 1642 मिमी, नवजा – 1915 मिमी आणि महाबळेश्वर – 2339 मिमी इतके झाले आहे. सध्या धरणात 6,482 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू असून, कोयना जलविद्युत प्रकल्प तसेच धरणाच्या कोणत्याही दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही.