सातारा जिल्ह्यात
तिसऱ्यांदा शाळांना सुट्टी
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ९ जुलैलाही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
संतोष शिराळे| सातारा
सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सलग तिसऱ्यांदा शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी सोमवार (६ जुलै) आणि मंगळवार (७ जुलै) रोजी शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) ९ जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुन्हा एकदा सुट्टीचे आदेश जारी केले आहेत.
आदेशानुसार ९ जुलै (गुरुवार) रोजी महाबळेश्वर, पाटण आणि जावळी या संपूर्ण तालुक्यांतील तसेच कराड, सातारा आणि वाई तालुक्यातील निवडक महसूल मंडळांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी राहणार आहे.
- महाबळेश्वर, पाटण, जावळी – संपूर्ण तालुके
- कराड तालुका – उंडाळे, सुपने, इंदोली व येळगाव महसूल मंडळ
- सातारा तालुका – कण्हेर, अंबवडे, दहिवडी व परळी महसूल मंडळ
- वाई तालुका – पसरणी व पाचगणी महसूल मंडळ
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, पूल पाण्याखाली जाणे, नाले-नद्यांना पूर येणे अशा घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेत शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापन व प्रशासकीय कामकाज पार पाडावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान खात्याच्या इशाऱ्याची दखल घेऊन अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!