Breaking news | अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस; २४ तासांत ५१३ मिमी, १९०३ नंतरची सर्वोच्च नोंद; सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर, पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी



अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर

महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस

२४ तासांत ५१३ मिमी, १९०३ नंतरची सर्वोच्च नोंद

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर

पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी

संतोष शिराळे, सातारा |

सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवार (६ जुलै) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ५१३.० मिमी पावसाची नोंद झाली असून हा अतिवृष्टी (Extremely Heavy Rainfall) प्रकारातील पाऊस आहे. भारतीय हवामान विभागाच्या महाबळेश्वर वेधशाळेच्या नोंदीनुसार १९०३ पासूनच्या नोंदींमध्ये २४ तासांतील ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी ठरली आहे. यापूर्वी २२ जुलै २०२१ रोजी ५९४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. महाबळेश्वर येथे किमान तापमान १८.४ अंश सेल्सिअस, आर्द्रता १०० टक्के तर हंगामातील एकूण पर्जन्यमान १,७१७.४ मिमी झाले आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

सातारा शहरातही पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत ५५.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील किमान तापमान २१.९ अंश सेल्सिअस, आर्द्रता ९५ टक्के असून हंगामातील एकूण पर्जन्यमान २१४.६ मिमी झाले आहे. रिमझिम पावसासह जोरदार वारेही वाहत आहेत.

दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू असून सकाळी ८ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ६३१.५४६ मीटर (२०७२ फूट) झाली आहे. धरणात २२.५४ टीएमसी (२२.५१ टक्के) जिवंत पाणीसाठा असून ७८,३२२ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

मोरणा धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६९.४२ टक्के पाणीसाठा झाला असून सांडव्यावरून ३,०८० क्युसेक्स आणि सिंचन/विद्युत विमोचकातून १७३ क्युसेक्स, असा एकूण ३,२५३ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मेढा–महाबळेश्वर रोडवरील केळघर घाटातील काळा खडक येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस विभागाला तातडीने सूचना देण्यात आल्या असून जेसीबीच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जोर येथे सर्वाधिक ५४७ मिमी पावसाची नोंद झाली असून सोनत ३७३ मिमी, सांडवली ३०५ मिमी, कास ३०३ मिमी, नवजा २६६ मिमी, कोयनानगर २५८ मिमी, धोम-बळकवडी २४९ मिमी, धोम २०४ मिमी, ठोसेघर १९६ मिमी, बामणोली १९५ मिमी, रांजणी १९३ मिमी आणि मेढा १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर तारळी १०९ मिमी, उरमोडी १०० मिमी, नागेवाडी व परळी प्रत्येकी ९६ मिमी, माळेवाडी ८० मिमी, बेलवडे ५८ मिमी, येळगाव ५८ मिमी, वाठार स्टेशन ५२ मिमी, चाफळ ५० मिमी असा पाऊस झाला.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाण्याची आवक

कोयना धरण – ७८,३२२ क्युसेक्स (सर्वाधिक आवक)

धोम धरण – ११,०८७ क्युसेक्स

कण्हेर धरण – १३,५७५ क्युसेक्स

उरमोडी धरण – ४,८७३ क्युसेक्स

तारळी धरण – ३,९५० क्युसेक्स

धोम-बळकवडी धरण – ७,१५७ क्युसेक्स

मध्यम प्रकल्पांतील आवक :

मोरणा धरण – ३,९०३ क्युसेक्स

उरमोडी (लघु) – ३२७ क्युसेक्स

वांग – १६५ क्युसेक्स

महू – ८७ क्युसेक्स

कोयना धरणात सर्वाधिक ७८,३२२ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून अद्याप धरणातून विसर्ग करण्यात आलेला नाही.

मोरणा धरणातून मात्र ३,२५३ क्युसेक्स (सांडवा ३,०८० + विमोचक १७३) विसर्ग सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने मोरणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदी-नाल्यांमध्ये उतरू नये, पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments