इलेक्ट्रिक पोलवरील
ॲल्युमिनियमच्या तारा
चोरी करणारी टोळी जेरबंद
पाच गुन्ह्यांची उकल, ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
संतोष शिराळे, सातारा |
पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एमएसईबीच्या इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चार जणांच्या टोळीला अटक केली. या कारवाईत पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकाने सखोल तपास, गोपनीय माहिती आणि सायबर विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश बबन जाधव (२३), दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (२६), आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (३३) यांचा समावेश असून सर्वजण ता. खटाव, जि. सातारा येथील रहिवासी आहेत.
चौकशीत आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १,२०८ किलो वजनाच्या ॲल्युमिनियमच्या तारा (किंमत ५.४३ लाख रुपये) तसेच महिंद्रा मॅक्स पिकअप (एमएच-१६-एवाय-९६६५) किंमत ६ लाख रुपये असा एकूण ११.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली असून त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!