कुडाळ शाळा व अंगणवाडी
परिसरातील धोकादायक
वृक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तातडीने उपाययोजना करण्याची पालकांची मागणी
मेढा | प्रतिनिधी
जावली तालुक्यातील कुडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्या परिसरातील जुने आणि मोठे वृक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे या वृक्षांच्या मोठ्या फांद्या तुटून शाळेच्या इमारतीवर किंवा परिसरात कोसळत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
शाळा आणि अंगणवाडीत शिक्षण घेणारी लहान मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक यांची दररोज या परिसरात वर्दळ असते. तसेच शिक्षकांची वाहनेही झाडाखाली उभी केली जात असल्याने एखादी फांदी अचानक कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
याबाबत वनविभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. पावसाचा जोर वाढत असल्याने वनविभाग, शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायतीने संयुक्त पाहणी करून धोकादायक वृक्षांची तांत्रिक तपासणी करावी. जेथे आवश्यक असेल तेथे सुकलेल्या व धोकादायक फांद्यांची छाटणी करावी आणि अत्यंत धोकादायक वृक्षांबाबत नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. "विद्यार्थ्यांच्या अंगावर एखादी फांदी पडून दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती आधीच करावी," अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यातील शाळा परिसरातील वृक्षांचे सुरक्षा ऑडिट करावे
जावली तालुक्यातील अनेक शाळा आणि अंगणवाड्यांच्या परिसरात मोठे व जुने वृक्ष आहेत. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे फांद्या तुटण्याच्या घटना घडत असल्याने वनविभागाने शिक्षण विभागाच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व शाळा परिसरातील वृक्षांचे सुरक्षा ऑडिट करावे. धोकादायक फांद्यांची छाटणी, रोगट वृक्षांवर आवश्यक उपचार आणि आवश्यकतेनुसारच वृक्ष हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा व अंगणवाडी परिसरातील धोकादायक वृक्षांची तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात.
- वीरेंद्र शिंदे (जिल्हा दिशा समिती सदस्य, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, कुडाळ)



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!