हरवलेला मोबाईल
परत मिळताच
चेहऱ्यावर फुलले हास्य
शाहूपुरी पोलिसांनी २५ नागरिकांचा विश्वास परत मिळवला
संतोष शिराळे | सातारा
मोबाईल हरवला की त्यामध्ये जपलेल्या आठवणी, महत्त्वाची कागदपत्रे, संपर्क क्रमांक आणि दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग हरवल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. अनेकजण मोबाईल परत मिळेल, अशी आशाच सोडून देतात. मात्र, सातारा शहरातील शाहूपुरी पोलिसांनी अशाच २५ नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवत तब्बल ६ लाख २५ हजार रुपयांचे २५ हरवलेले स्मार्टफोन त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देत "पोलीस म्हणजे विश्वास" हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, डीबी पथकाने सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांच्या मदतीने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हस्ते-परहस्ते गेलेल्या मोबाईलधारकांशी वारंवार संपर्क साधत अथक प्रयत्न केले. अनेक दिवसांच्या चिकाटी, सातत्य आणि तांत्रिक तपासातून एकूण ६ लाख २५ हजार रुपये किमतीचे २५ स्मार्टफोन हस्तगत करण्यात यश आले. त्यानंतर हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. काहींनी तर "आता मोबाईल मिळणार नाही" अशी आशाच सोडली होती. मात्र, शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे केवळ मोबाईलच नव्हे, तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासही परत मिळाला. अनेकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यापुढेही हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी शैलेंद्र गोवेकर तसेच पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ आणि रोहित बाजारे यांनी केली.
"पोलीस फक्त गुन्हे उघडकीस आणत नाहीत, तर नागरिकांच्या चेहऱ्यावर हरवलेले हास्यही परत आणतात," याची प्रचिती शाहूपुरी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीतून पुन्हा एकदा आली.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!