अवघ्या १२ तासांत आरोपी जेरबंद
बनावट बँक एनईएफटी
स्क्रीनशॉट दाखवून
व्यावसायिकांची फसवणूक
सातारा शहर पोलिसांनी उघड केले १२ गुन्हे
२३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
संतोष शिराळे | सातारा
ऑनलाईन व्यवहाराच्या नावाखाली बनावट बँक एनईएफटी (NEFT) स्क्रीनशॉट दाखवून व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक करत सातारा शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेचा आणि तांत्रिक तपास कौशल्याचा प्रत्यय दिला आहे. आरोपीकडून महाराष्ट्रासह गोवा राज्यातील १२ गुन्हे उघडकीस आणत तब्बल २३ लाख ४५ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे आणि त्यांच्या डी.बी. पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दि. २७ जून रोजी सातारा शहरातील पोवई नाका येथील एस.एस. मोबाईल शॉपमधून एका व्यक्तीने सॅमसंग फोल्ड-७ मोबाईल खरेदी करून ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवला आणि सुमारे १.७५ लाख रुपयांचा मोबाईल घेऊन पसार झाला होता. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने आरोपी आदित्य विनोद गायकवाड (वय २२, रा. कोंढापुरी, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील मोबाईल हस्तगत करण्यात आला.
पुढील चौकशीत आरोपीने सातारा, सांगली, पुणे, रायगड आणि गोवा येथेही अशाच प्रकारे बनावट बँक एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर साहित्य फसवणुकीने घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी १२ गुन्ह्यांची उकल करत आरोपीकडून सोने, महागडे मोबाईल, एलईडी टीव्ही, एसी, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईलसह एकूण २३.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने सातत्याने केलेली प्रभावी कारवाई, तांत्रिक तपासाचा अचूक वापर आणि वेगवान निर्णयक्षमता यामुळे सातारा शहर पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत अल्पावधीत गुन्ह्यांची उकल करण्याची ही पद्धत इतरांसाठीही आदर्श ठरत असल्याची प्रतिक्रिया शहरातील व्यापारी आणि नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, बनावट बँक एनईएफटी स्क्रीनशॉट दाखवून फसवणूक झालेल्या किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्याची माहिती असलेल्या नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सातारा शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचतो," हा संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!