आनेवाडी टोलनाक्याजवळ
आशियाई महामार्गावरील
रस्ता पहिल्याच पावसात उखडला
कोट्यवधींच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा
संतोष शिराळे | सातारा
पुणे–बंगळूर आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळील रस्ता पहिल्याच जोरदार पावसात उखडल्याने संबंधित यंत्रणा, ठेकेदार आणि कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या डांबरीकरणाचा थर वाहून गेला असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावत असताना पहिल्याच पावसात रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेच्या कराच्या पैशातून उभारण्यात आलेले रस्ते एवढ्या कमी कालावधीत उखडत असतील, तर कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, खड्डे बुजविण्यासाठी करण्यात येणारी तात्पुरती मलमपट्टीही काही दिवसात वाहून जात असल्याने समस्या जैसे थेच राहत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही? गुणवत्ता तपासणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? असे प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत. अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, की एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर दोषींवर कारवाई होणार, असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून भविष्यात गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी. "जनतेच्या करातून उभारलेले रस्ते जर पहिल्याच पावसात उखडत असतील, तर हा केवळ निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!