सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रिपब्लिकन सेनेचे उग्र आंदोलन; आत्मदहनाच्या प्रयत्नाने खळबळ, महिला कार्यकर्ती बेशुद्ध

सातारा जिल्हाधिकारी

कार्यालयात रिपब्लिकन सेनेचे

उग्र आंदोलन

आत्मदहनाच्या प्रयत्नाने खळबळ

महिला कार्यकर्ती बेशुद्ध

प्रशासनाशी चर्चेनंतर आंदोलन मागे

संतोष शिराळे | सातारा

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी उग्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान दोन कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

आंदोलन अधिक तीव्र होत असताना एका कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वागत कमानीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासन आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोन्ही कार्यकर्त्यांना रोखले.

दरम्यान, आंदोलनाच्या गोंधळात एका महिला कार्यकर्तीची प्रकृती अचानक बिघडून ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. या सर्व घटनांमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यानंतर प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत त्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर रिपब्लिकन सेनेने आंदोलन आणि उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

उपनिवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील तसेच सातारा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी जळक यांच्या हस्ते आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी (सरबत) देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरबत प्राशन करून आपले आंदोलन अधिकृतरीत्या मागे घेतले.

प्रशासनाने संबंधित मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. त्यामुळे दिवसभर तणावपूर्ण राहिलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अखेर शांतता प्रस्थापित झाली.

Post a Comment

0 Comments