विद्यार्थी घडविण्याचे काम वाघमारे दांपत्याने केले : लोकनेते रामशेठ ठाकूर; रयत सेवक प्रा. डॉ. सुभाष व सुनिता वाघमारे यांच्या सेवापूर्ती सन्मान व कृतज्ञता समारंभात गौरवोद्गार

विद्यार्थी घडविण्याचे काम

वाघमारे दांपत्याने केले :

लोकनेते रामशेठ ठाकूर

रयत सेवक प्रा. डॉ. सुभाष व सुनिता वाघमारे यांच्या सेवापूर्ती सन्मान व कृतज्ञता समारंभात गौरवोद्गार

सातारा | प्रतिनिधी 

"रयत शिक्षण संस्थेतील रयत सेवक, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे आणि त्यांच्या पत्नी, जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये येथील मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे या पती पत्नींना चांगल्या गोष्टी करण्याचे वेड आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडविण्याचे आणि संस्कार देण्याचे कार्य ही जोडी करीत आहे. ही जोडी याच कार्यासाठी बनलेली आहे. त्यांच्या कार्याचे सर्वांनी एकत्र येऊन गुणगान केले पाहिजे, कारण ते समाजामध्ये इतके मिसळून गेले आहेत. कर्मवीरांच्या विचारांचा वारसा जपत वाघमारे दांपत्याने केवळ नोकरी केली नाही, तर विद्यार्थी घडविण्याचे आणि संस्कार देण्याचे कार्य मनापासून केले आहे," असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभागप्रमुख तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे आणि जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल, वर्ये येथील मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे यांच्या सेवापूर्ती सन्मान व कृतज्ञता समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. समारंभास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे. के. जाधव (बापू), मा. यशवंत देशमुख, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार, मध्य विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहायक विभागीय अधिकारी दिनेश दाभाडे, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, प्राचार्या डॉ. वंदना नलवडे, समाजकार्यकर्ते दिनकर झिंब्रे, डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने देशमुख, प्रा. डी. ए. माने, प्रा. प्रदीप हिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजसेवेचा अर्थ स्पष्ट करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, "समाजसेवा म्हणजे केवळ सोशल सर्व्हिस नव्हे. समाजाला शिक्षित करणे आवश्यक आहे. शिक्षित करणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले संस्कार घडविण्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सर्व करणे होय. वाघमारे दांपत्याकडे ते सर्व आहे. विद्यार्थ्यांना संस्कार देण्याचे काम त्यांनी मनापासून केले आहे. स्वतःच्या मुलाकडेही त्यांनी चांगले लक्ष दिले असून त्यांचे घर संस्कारित झाले आहे."

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या संशोधक वृत्तीचे कौतुक करताना ते म्हणाले, "माझा आणि त्यांचा परिचय दोन-तीन वर्षांचा आहे. ते अभ्यासू आहेत. माझ्या संदर्भाने ते एक पुस्तक लिहित आहेत. त्यांनी माझी वंशावळ तयार केली आहे. मी कुठे जगलो, मी कसा वाढलो, याचा अभ्यास ते करीत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ते काम करतात. शेवटच्या टोकापर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यांनी माझ्या बहिणी, नातेवाईक, गावकरी आणि मित्रांना भेटून माहिती घेतली आहे. ज्याची इच्छाशक्ती मोठी असते तो पुढे जातो."

ते पुढे म्हणाले, "वाघमारे जोडी काटक आहे. ते शंभर वर्षांपर्यंत जगतील. ही जोडी सलामत राहिली पाहिजे. तिने काम करून समाज सुधारला पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन समाजाला मिळाले पाहिजे. जो व्यासंगी असतो तो अंतर्ज्ञानी असतो. मी जरी पंच्याहत्तर वर्षांचा असलो, तरी वय वाढले म्हणजे माणूस मोठा होत नाही. अभ्यास, वाचनसंस्कृती आणि व्यासंग महत्त्वाचा असतो. जो व्यासंगी माणूस असतो तोच खरा पंडित आणि आत्मज्ञानी असतो. माणसाचे आयुष्य किती असेल हे माहीत नाही; पण शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करत राहणे महत्त्वाचे आहे. मी साधा माणूस होतो, साधा मास्तर होतो, साधा माती-दगडाचा कॉन्ट्रॅक्टर होतो. दोन वेळा संसदेत गेलो; पण असा व्यासंग माझ्याकडे नाही. आम्ही माणसे जोडण्याचा व्यासंग करतो. हे दोघे ज्ञानाचा व्यासंग करीत आहेत. यांच्यासारख्या लोकांची समाजाला खरी गरज आहे. तुमची प्रकृती चांगली राहो आणि समाजसेवेचे तुमचे व्रत असेच सुरू राहो," अशा शब्दांत त्यांनी वाघमारे दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले, "कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या बोधवाक्याची निवड करताना 'अत्त दीप भव' हे बोधवाक्य सुचविण्याच्या प्रक्रियेत प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' या बोधवाक्याशी 'अत्त दीप भव' हे बोधवाक्य पूर्णपणे सुसंगत आहे. 'स्वयंप्रकाशित व्हा' हा त्याचा अर्थ अधिक उन्नत करणारा आहे. संस्कृत, प्राकृत आणि मराठी या तिन्ही भाषांशी त्याचे साम्य असल्यामुळे हे बोधवाक्य अधिक समर्पक ठरले. निपक्षपाती पद्धतीने झालेल्या निवड प्रक्रियेनंतर या बोधवाक्याला सर्वांची मान्यता मिळाली आणि त्याबद्दल प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे अभिनंदन करण्यात आले , सुनिता वाघमारे यांचे आचरण शालीन आहे.त्यांच्या कार्यावर प्रकाश पडायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी त्यांच्या कुटुंब वत्सल कामातील शाळेतील वैचारिक व शैक्षणिक व नैतिक योगदानाचा गौरव केला.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी भाषा मंडळाचे प्रभारी संचालक म्हणून केलेल्या कार्याचा गौरव केला. भाषा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या सलग दोन वर्षांच्या वार्षिक अहवालाच्या निर्मिती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत मनापासून काम केल्याचे सांगून त्यांच्या नियोजनक्षमतेचे आणि कार्यतत्परतेचे कौतुक केले. विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे म्हणाले की सुनीता वाघमारे यानी मुख्याध्यापक म्हणून काम करताना या पाच वर्षात वर्षात एकही तक्रार संस्थेकडे आली नसल्याचे सांगून उत्कृष्ट काम केल्याची प्रशंसा केली.

मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, "हा कार्यक्रम माझ्या सन्मानापेक्षा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. वडिलांचे संस्कार ,तळमळ ,आणि परिस्थितीची जाणीव यातूनच आपण घडलो असून शिक्षक म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची व्यक्तिगत काळजी घेऊन मनापासून शिकवले असे त्या म्हणाल्या. रयत शिक्षण संस्थेने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. त्यामुळे वर्ये येथील शाखेत अनेक विकासकामे करता आली. रयत शिक्षण संस्थेबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन.अशी कृतज्ञता त्यांनी प्रकट केली.

प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, "लोकनेते रामशेठ ठाकूर हे मराठी विभागाचे विद्यार्थी असून त्यांची कार्यकामगिरी अभिमानास्पद आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. आधुनिक काळात असा देणगीदार भारतातही क्वचितच आढळेल. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रेरणास्थान म्हणून उभारण्यात आला आहे. त्याच धर्तीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या दातृत्वपूर्ण आणि कर्तृत्वपूर्ण जीवनाचे दर्शन घडविणारे छायाचित्र दालन छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये उभारण्यात यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची कायम प्रेरणा मिळेल. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या यथार्थ कार्याचा परिचय करून देणारा ग्रंथ संपादित करण्याचे काम चालू असल्याचे , त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले, "प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी मराठी भाषा विभागासाठी देणगीदार मिळवून प्राचार्य शंकरराव उनउने स्मृती दालन आणि मराठी भाषा प्रयोगशाळा उभारण्यात मोलाचे योगदान दिले. विविध शैक्षणिक कार्यक्रम, विस्तार उपक्रम, सामंजस्य करार आदी अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. मराठी भाषा विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे, आम्ही त्यांच्या कार्यास नेहमीच साथ दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभात प्रा. पोपट काटकर, डॉ. शुभांगी कुंभार, प्रा. डॉ. प्रदीप शिंदे, नवनाथ जगदाळे, प्रा. डी. ए. माने, लाखे, डॉ. चंद्रकांत कांबळे, चंद्रकांत कान्बिरे, विशाल पोखरकर, समीक्षा चव्हाण, सम्यक शाक्यरत्न, सौ. वासंती जाधव आणि सुमित वाघमारे यांनी मनोगते व्यक्त करून वाघमारे दांपत्याच्या शैक्षणिक, संशोधन, साहित्यिक, सामाजिक आणि प्रशासकीय ,कौटुंबिक कार्याचा गौरव केला.

समारंभाच्या प्रारंभी डॉ. आबासाहेब सरवदे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून प्रा. डॉ. सुभाष वाघमारे आणि मुख्याध्यापिका सुनिता वाघमारे यांच्या शैक्षणिक, संशोधन, साहित्यिक, सामाजिक आणि प्रशासकीय कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन सविता कारंजकर यांनी केले. डॉ. विद्या नावडकर आणि सविता कारंजकर यांनी सूत्रसंचालन केले, तर रजनी देसाई यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments