अतिवृष्टीचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर; पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी; धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध

अतिवृष्टीचा इशारा;

प्रशासन अलर्ट मोडवर

पाच तालुक्यांतील शाळा-महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी

धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागात नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध

संतोष शिराळे | सातारा

भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यापक उपाययोजना लागू केल्या आहेत. पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये दरड कोसळणे, भूस्खलन आणि पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारीचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.

धोकादायक पर्यटनस्थळे, धबधबे, तलाव व नदीकाठच्या भागांमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले असून, अपघातप्रवण ठिकाणी इशारा फलक लावण्याचे आणि पर्यटनस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरडप्रवण भागांतील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर, पुनर्वसन केंद्रांमध्ये निवास, पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

घाटरस्त्यांवर अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरस्थितीत पुलांवरून पाणी वाहत असल्यास संबंधित मार्ग तात्काळ बंद करून पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. हवामान, धरण विसर्ग आणि नदीपात्रातील पाणीपातळीची माहिती सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यासह तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना मंगळवार, दि. ७ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित संस्थांनी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई वेधशाळेने सातारा जिल्ह्यासाठी पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला असून, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. विशेषतः सातारा घाट परिसरासाठी ८ जुलै रोजी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

७ जुलै रोजी सातारा जिल्ह्यास 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, मेघगर्जनेसह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ जुलै रोजी घाट परिसरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज असल्याने 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी 'यलो अलर्ट' असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-ओढे दुथडी भरून वाहत असून, दरडी कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाट रस्त्यांवर विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments