महू व हातगेघर धरणातून पुढील २४ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

महू व हातगेघर धरणातून

२४ तासांत पाणी 

सोडण्याची शक्यता

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

संतोष शिराळे | सातारा

जावळी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महू आणि हातगेघर धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत दोन्ही धरणांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता असल्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

महू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, विसर्ग सुरू झाल्यास कुडाळी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच पुलावरून पाणी वाहत असताना तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच हातगेघर धरणाच्या सांडव्यावरूनही पुढील २४ तासांत पाणी सोडले जाण्याची शक्यता असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी जनावरे, शेतीसाहित्य व इतर मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि सतर्क राहावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

महू, टोपेवाडी, पिंपळी, खर्शी बारामुरे, करहर, वालुथ, हुमगाव, आखाडे, बामनोली, सांगवी, कुडाळ, सर्जापूर, कळंबे, उडतारे तसेच हातगेघर व महू धरणाच्या नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments