"संघर्ष... संघर्ष... संघर्ष!" रामराजेंचा एल्गार; श्रीराम कारखाना बंद करण्याचा डाव कोणाचा? ६ जुलैला सभासदांसमोर होणार मोठा खुलासा रामराजेंचे व्हॉट्सॲप स्टेटस व्हायरल; विरोधकांना अप्रत्यक्ष आव्हान?

 



"संघर्ष... संघर्ष... संघर्ष!" 

रामराजेंचा एल्गार

श्रीराम कारखाना बंद करण्याचा डाव कोणाचा?

६ जुलैला सभासदांसमोर होणार मोठा खुलासा

रामराजेंचे व्हॉट्स ॲप स्टेटस व्हायरल

विरोधकांना अप्रत्यक्ष आव्हान?

संतोष शिराळे, सातारा | 

फलटणच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा राजकीय एल्गार आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून केला आहे. "श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद करण्याचा सतत डाव सुरू आहे... आता संघर्षाशिवाय पर्याय नाही," असा थेट संदेश देत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष पण तीव्र इशारा दिला आहे.

रामराजे यांनी ६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची विशेष सभा बोलावली आहे. सभासदांनी आपला सभासद क्रमांक घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करत त्यांनी कारखाना बंद करण्यासाठी सुरू असलेल्या "कुटील डावामागचे सत्य", कारखान्याचे भवितव्य आणि पुढील वाटचाल याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, बैठकीच्या आवाहनानंतर लगेचच रामराजे यांनी दुसरे स्टेटस टाकत फक्त तीन शब्द लिहिले – "आपली प्रतिक्रिया?" या एका प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सभासद आणि जनतेचा कौल जाणून घेण्याबरोबरच विरोधकांनाही त्यांनी थेट जनतेसमोर उभे केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रामराजे यांच्या स्टेटसमधील शेवटची ओळही तितकीच लक्षवेधी ठरली आहे – "संघर्ष, संघर्ष, संघर्ष!" या घोषणेमुळे श्रीराम कारखान्याच्या अस्तित्वासाठी निर्णायक लढाईचे संकेत मिळत असून, आगामी बैठक ही केवळ माहितीपर न राहता राजकीय शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर रामराजेंचे हे दोन्ही स्टेटस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कारखाना बंद करण्याचा डाव नेमका कोणाचा? त्यामागील सत्य काय? आणि ६ जुलैच्या सभेत कोणाचा पर्दाफाश होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आता संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष ६ जुलैच्या बैठकीकडे लागले असून, या सभेत रामराजे नेमका कोणावर निशाणा साधणार आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत कोणते मोठे खुलासे करणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Post a Comment

0 Comments