हॉलमार्क बांगड्यांच्या नावाखाली 10.35 लाखांची फसवणूक; सातारा शहर डीबी पथकाची मोठी कारवाई, पाच आरोपी अटकेत

हॉलमार्क बांगड्यांच्या नावाखाली

10.35 लाखांची फसवणूक

सातारा शहर डीबी पथकाची कारवाई

पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

संतोष शिराळे, सातारा : 

सातारा शहरातील सराफ व्यावसायिक आणि फायनान्स कंपन्यांची हॉलमार्क असलेल्या बनावट पिवळ्या धातूच्या बांगड्या तारण ठेवून 10 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आले आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट हॉलमार्क बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डीबी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे डीबी पथकाने परजिल्ह्यातून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सातारा शहर पोलीस ठाण्यातील दोन आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

उमेश शशिकांत शिंदे (वय 40) – मूळ रा. कोरेगाव, सध्या मुंबई, सोमनाथ भुजंगराव बाबर (वय 39) – सध्या देगाव रोड, सातारा, सिकंदर बादशहा शेख (वय 48) – रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे असून या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी सर्व सराफ व्यावसायिक, बँका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांना सोने तारण स्वीकारण्यापूर्वी किंवा खरेदी-विक्री करताना दागिन्यांची व हॉलमार्कची अधिकृत यंत्रणेमार्फत खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद व्यवहार अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments